
‘कृतार्थ’तर्फे ‘वंदे मातरम्’ ची निर्मिती
‘संभवामी युगे युगे’ सारख्या भव्यतम महानाट्याच्या पावलांवर पाऊल ठेवून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतिपर्वाचा समग्र इतिहास एका नव्या महानाट्याद्वारे लवकरच रंगभूमीवर येणार असून गोमंतकीय निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी साकारलेल्या या ‘वंदे मातरम्’ नामक महानाट्यातून नव्या पिढीसमोर तो सारा इतिहास जिवंत होणार आहे.म्हार्दोळच्या ‘कृतार्थ’ या संस्थेच्या वतीने साकारत असलेल्या या महानाट्यामध्ये चार मजली इमारतीच्या उंचीचा चार हजार चौरस फुटांचा भव्य रंगमंच, तीनशे कलाकारांचा सहभाग आणि नृत्य, नाट्य, गीत, संगीताचा मनोरम आविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे. एकावेळी पाच हजार प्रेक्षक या महानाट्याचे प्रयोग पाहू शकणार असून उभ्या फिरत्या रंगमंचाचा वापर प्रथमच या महानाट्याच्या निमित्ताने होणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील चित्तथरारक प्रसंगांचा एक ओघवता नाट्यानुभव देण्यासाठी ‘कृतार्थ’, म्हार्दोळ ही संस्था सज्ज झाली असून शरद पोंक्षे, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अरुण नलावडे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या वाणीतून हा सारा इतिहास जिवंत होणार आहे. सुविख्यात संगीतकार कौशल इनामदार यांनी या महानाट्यातील गीतांना संगीतबद्ध केले आहे.
घोडे, बैल अशा प्राण्यांसह बग्गी, मोटार आणि अगदी ब्रिटीशकालीन आगगाडीचाही प्रत्यक्ष वावर या महानाट्यात केला जाणार आहे. काकोरी हत्याकांड, बाबू गेनूचे हौतात्म्य, भगतसिंहांचे फासावर जाणे, अशा इतिहासातील प्रेरक प्रसंगांचे प्रत्यक्ष दर्शन या महानाट्यात प्रेक्षकांना घेता येईल. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, मंगल पांडे येथपासून भारताच्या मुक्तीपर्यंतचा हा इतिहास या महानाट्यातून साकारणार आहे. ब्रिटिशांचे भारतात पडलेले पहिले पाऊल, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्यस्थापना, १८५७ चा उठाव, सावरकरांनी ब्रिटीश राजसत्तेला दिलेली चपराक, जालियनवाला बागेतील हत्याकांड, नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेचे क्रांतीपर्व अशा असंख्य घटनांचा प्रत्यक्ष अनुभव हे महानाट्य देणार आहे. महानाट्याचे प्रयोग येत्या २६ जानेवारीपासून फर्मागुढी येथे सुरू होणार असून नुकत्याच त्याच्या तालमी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या हस्ते भारतमातेच्या मूर्तीसमोर मशाल प्रज्वलित करून या महानाट्याच्या तालमींचा शुभारंभ फोंड्यात झाला. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामदास चाफाडकर, लेखक आदित्य जांभळे, दिग्दर्शक दिलीप देसाई व निर्मिती प्रमुख व संयोजक राजेंद्र देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. ‘संभवामी..’ सारख्या महानाट्याने प्रेक्षकांच्या वाढवलेल्या अपेक्षा हे महानाट्यही पूर्ण करील असा विश्वास संयोजक राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केला.