आक्रमक मुलांकडून कारवर दगडफेक
चिंबल येथील अपना घरमधील मुले आक्रमक बनत असल्याने तेथील अधिकारी व कर्मचारी वर्गालाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. काल सकाळी आक्रमक बनलेल्या चार पाच मुलांनी अपना घरासमोर पार्क करून ठेवलेल्या एका खाजगी कारवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केले. या प्रकारामुळे तेथे पोलिसांना धाव घ्यावी लागली. तेथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकार्यांवरही दगडफेक करण्याचा प्रकार घडल्याचे कळते. सुदैवाने अधिकारी जखमी झाले नाहीत. सुधारगृहातून मुक्त केलेली मुलेही पुन्हा पुन्हा गुन्हे करीत असल्याने त्यांना अपना घरात दाखल करावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे.
मनुष्य बळाचा अभाव
‘अपना घरा’त मनुष्यबळाचाही अभाव असून तेथे काम करण्याचीही कर्मचार्यांची तयारी नसते. वरील ‘अपना घरा’त ७० टक्के कर्मचारी महिला आहेत व त्यांना जीव मुठीत घेऊनच काम करावे लागते, असे सूत्रांनी सांगितले. स्थलांतरित मजूरांच्या मुलांचाच त्यात अधिक भरणा असल्याचे सांगण्यात आले.