मडगाव रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याच्या निनावी पत्राने स्टेशनवरील कर्मचारी व पोलिसांची काल दुपारी तारांबळ उडाली. मात्र तपासणी अंती ती अफवा असल्याचे सिद्ध झाले.
काल दुपारी २ वा. मडगाव कोकण रेल्वे स्टेशनमास्तर समीक्षा भेंडे यांना फॅक्सवरून निनावी पत्र आले. त्यात धावत्या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचे लिहिले होते. त्यांनी कर्मचारी व पोलिसांना माहिती देताच, मडगाव पोलीस स्टेशन, कोकण रेल्वे पोलीस, रेल्वे पोलिसांनी स्टेशनावर धाव घेतली. बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणून रेल्वे स्टेशन परिसराची, रेल्वे मार्गाची तपासणी केली. तसेच वास्कोहून दिल्लीला जाणार्या गाडीचीही तपासणी केली. पण काहीच सापडले नाही. बॉम्बसंबंधी वृत्त गोव्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर देण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत मडगाव रेल्वे स्टेशनवर पोलीस तपासणी करीत होते.
म्हापशातही बॉम्बची अफवा
म्हापसा पोलिसांना काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाने दूरध्वनी वरून थिवी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिल्यावर म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर, पोलीस उपनिरीक्षक जीतिन पोतदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामा रेडकर व इतर हवालदारांना त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. यावेळी श्वानपथक, बॉम्ब तपासणीस आणि इतर अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन सर्वत्र पहाणी केली आणि रात्री उशिरापर्यंत त्यांनी घटनास्थळी पाळत ठेवली. अज्ञात इसमाने फोन केला. त्यावेळी त्याने कुणीतरी रेल्वेत अथवा थिवी रेल्वे स्थानकावर बॉम्ब टाकून ते उधळून लावण्याची आखणी केल्याचे सांगितले. त्यामुळे म्हापसा पोलिसांची बरीच धावपळ झाली.