‘सहारा’ डायरीत नाव असल्याचा आरोप
नवी दिल्ली सहारा उद्योग समूहाचे तुरुंगात असलेले प्रमुख सुब्रत रॉय यांच्या एका डायरीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे नाव असल्याचा दावा करीत काल तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी लोकसभेत गदारोळ माजवला. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. लोकसभेत वरील मुद्दा उपस्थित करून तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली. शहा यांचे नाव रॉय यांच्या डायरीत आढळून आल्यानंतर सीबीआयने या अनुषंगाने कोणती कृती केली याचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे अशी मागणीही तृणमूल कॉंग्रेसतर्फे करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सभात्यागही केला. या प्रश्नावर चर्चेसाठी प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्यात यावा यासाठी त्यांचे खासदार सुदिप बंडोपाध्याय यांनी नोटीस दिली होती. मात्र सभापती सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळली. नोव्हेंबर महिन्यात सीबीआयने रॉय यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता तेथे सापडलेल्या डायरीत अमित शहा यांचे नाव आढळून आले होते अशी माहिती बंडोपाध्याय यांनी पत्रकारांना दिली. ‘‘रॉय यांच्या डायरीतील नावांविषयी सीबीआयकडून गुप्तता का पाळली जाते याचे उत्तर आम्हाला हवे आहे. आम्ही याबाबत गप्प बसणार नाही. या विषयावर आम्हाला चर्चा हवी आहे.’’ असे बंडोपाध्याय म्हणाले. मात्र केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिज्जू यांनी वरील आरोप फेटाळले. वरील आरोप हे चुकीच्या तर्कांवर आधारित असून ते राजकीय स्वरुपाचे असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर भाजप खासदार किरिट सोमेय्या यांनी तृणमूल कॉंग्रेसवर पलटवार केला. प. बंगालमधील शारदा चीट फंड प्रकरणी तृणमूलचे राज्य सरकार सीबीआयच्या तपासकामात अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. या घोटाळ्यात तृणमूल कॉंग्रेसच्या डझनभर नेत्यांची नावे आली असल्याचा आरोप त्यांनी केला.