– श्रीरंग व्यंकटेश जांभळे, सावईवेरे
गोवा हे देशाच्या पश्चिम किनारपटट्ीवर वसलेले राज्य. परशुरामभूमी म्हणून याची ओळख. सुंदर सागरी किनारे, जैवविविधता, निसर्गरम्य वातावरण, पश्चिम घाटाच्या रांगा व डोंगरदर्यांचा हा प्रदेश पाहण्यासाठी देशभरातील, नव्हे तर जगातील लोकांना असलेले वेड. म्हणून हे छोटेसे राज्य जगभर प्रसिद्ध. त्याचबरोबर इथला शेतीचा इतिहासही समृद्ध. विविध प्रकारची व विविध जातीची धान्ये, कंदमुळे व अन्य भाज्या, फळे, फुले येथील जीवनात पूर्वांपार असलेले शेतीचे स्थान अधोरेखित करतात. ज्या प्रदेशाचे नावच गायीपासून निर्माण झाले असा हा ‘गोमंतक’ कृषीप्रधान असला पाहिजे याविषयी कोणाचे दुमत असूच नये. लहान राज्य असल्यामुळे येथे वेगळे कृषी महाविद्यालय स्थापन झाले नाही, पण भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ सारख्या राज्यातील कृषी विद्यापीठांतून कृषीविषयक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. आज अशा ठिकाणाहून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी गोव्यात आहेत. दरवर्षी ८-१० विद्यार्थी अशा प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी गोव्याबाहेर जातात.१९९५ नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम योजनेअंतर्गत राज्यातील शिक्षण खाते व गोवा बोर्डाने उच्च माध्यमिक स्तरावर उद्यानविद्या व फुलशेतीविषयक अभ्यासक्रम आखले. काही शिक्षणसंस्थांनी अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले. हे अभ्यासक्रम चांगले व्हावेत, चालावेत यासाठी काही संस्थाचालक, शिक्षक व अन्य कृषीप्रेमींनीही प्रयत्न केले. यातून काही विद्यार्थीही तयार झाले. परंतु कालांतराने ते बंदही पडले. त्यावेळी सुरू झालेल्यांपैकी फक्त दोनच ठिकाणी अजूनही ते चालतात.- एक वाळपई व दुसरे सांगे येथे. ते असे का बंद पडले? तेथून शिकून मुले पुढे काय करतील अशी अपेक्षा होती व आता प्रत्यक्षात काय करतात, याविषयी चिंतन होऊन त्यादृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
दरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कृषी विषयक पदविका व पदवी घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. काहींनी ते अभ्यासक्रम पूर्णही केले. पण कृषी विद्यापीठातील नियमित अभ्यासक्रम व सदर मुक्त विद्यापीठांतर्गत चालणारे अभ्यासक्रम यातील तफावत लक्षात घेता तिकडे जाणारे विद्यार्थीही आता दिसत नाहीत.
फळे, भाज्या, फुले यांची लागवड व निर्यात, पशुपालन व संवर्धन, खत उत्पादन, अन्नधान्याचे प्रक्रिया उद्योग, शेतीमालाचे विपणन, रोपवाटिका संगोपन, जल व्यवस्थापन, कृषी पर्यटन इत्यादी क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच कृषी क्षेत्रातील नव्या नव्या विद्याशाखेत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. आपली एकंदर शिक्षणप्रणाली शहरी-मध्यमवर्गीय मूल्यांचा पुरस्कार करते. यामुळे खेड्यातील मुलगा शिकला तर तो आधी शेतीपासून, मग घरापासून आणि शेवटी गावापासून दूर जातो. आपल्या शिक्षणाने किंवा उच्च शिक्षणाने नोकरी मिळवणे या गोष्टीला शिक्षणाचे अंतिम ध्येय किंवा साध्य ठरवले आहे. ती ज्यांना मिळते ते उजळ माथ्याने शेती व ग्रामीण जीवनापासून दूर जातात. ज्यांनी शिक्षण घेतले, परंतु नोकरी मिळाली नाही, असा प्रचंड युवावर्ग आज खेड्यापाड्यात पाहायला मिळतो. त्यांना उपजीविकेसाठी शेतीशिवाय सगळे काही करायची तयारी ठेवलेली दिसते. ते मोटारसायकल चालवतील, गाडावजा टपरी टाकतील, राजकारण्यांच्या मागे फिरतील, पण शेतात जाणार नाहीत, कारण शिकलेला माणूस शेती करत नाही असा दृढ समज आज समाजव्यवस्थेत पसरला आहे. सुदैवाने आज भलेही भारत अन्नधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात समाधानकारक कामगिरी करत आहे, पण नजीकच्या भविष्यात जेव्हा वयोवृद्धांची पिढी शेतीपासून दूर गेलेली असेल आणि त्यांची जागा घेण्यासाठी तरुणवर्ग पुढे येणार नाही, त्यावेळी तेथील शेती उद्योगाची स्थिती काय होईल?
गोवा बोर्डाने इयत्ता ९ वी व १० वी साठी प्रि-व्हेकेशनल अभ्यासक्रमाची तरतूद केली आहे. त्यात गणित किंवा समाजशास्त्र विषय सोडून उद्यानविद्या किंवा फुलशेतीसोबतच अन्य काही विषय घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गोव्यातील काही विद्यालयांतून ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ९ वी, १० वीत मुलांना या विषयाचे प्राथमिक ज्ञान मिळावे. आणखी काही विद्यालयांनी (विशेषतः ज्या ठिकाणी विद्यार्थी शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात) अशी व्यवस्था केली पाहिजे. तसेच अशा मुलांना पुढे याच क्षेत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
सावईवेरे (फोंडा) येथे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मांगीरिश पै रायकर व त्यांच्या कुटुंबियांनी आपली वडिलोपार्जित वास्तू व काही जमीन कृषी विषयक शिक्षणासाठीच दिली आहे. त्यांचे आजोबा रामनाथ कृष्णा पै रायकर यांच्या नावे कृषी विषयाला वाहिलेली शिक्षणसंस्था त्यांनी सुरू केली असून गोवा बोर्डाशी संलग्न उच्च माध्यमिक स्तरावरील (११ वी, १२ वी) कृषी विषयक अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रात्यक्षिकांवर आधारित ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न येथे केला जातो, तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न पदविका अभ्यासक्रमाला या ठिकाणी मान्यता मिळाली आहे. अभ्यासक्रम पदवी स्तरावर सुरू करण्यासाठी गोवा विद्यापीठांतर्गत बोर्ड ऑफ स्टडीजची स्थापना करून त्याचे कामकाज सुरू झाले आहे. पदवी स्तरावर केंद्र सरकारच्या नॅशनल व्हेकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत कृषी विषयक अभ्यासक्रम सुरू व्हावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. परंतु या सर्व प्रयत्नांना आर्थिक आधाराची फार मोठी गरज आहे. अशा शिक्षणसंस्थांना विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे अनुदान देण्याची आवश्यकता आहे. आज रोजी राज्यात उच्च माध्यमिक स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचे कोणतेच धोरण नाही. त्यामुळे येथील शिक्षक मोठ्या प्रमाणावर तुटपुंज्या पगारात आपली सेवा देतात. विद्यालयामध्ये अभ्यासक्रमाविषयी जास्ती सुविधा उपलब्ध नाहीत. याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो व हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांची गुणवत्ताही प्रभावित होते. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी मनुष्यबळ विकासासाठी उच्च प्राथमिकता देण्याचे घोषित केले आहे. राज्य सरकारने कृषी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देऊन राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या शेती उद्योगांसाठी योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी भरीव प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.
दूध उत्पादनवाढीसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. भरीव अनुदान दिले जाते, पण याचबरोबर देशी गाईंचे संगोपन व त्याद्वारे पंचगव्य आधारित वस्तू व औषध निर्मितीवर भर दिल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे यासाठी पशुसंवर्धन व चिकित्सा खात्यात वेगळ्या विभागाची निर्मिती करणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन खात्याकडे असलेल्या पशु-चिकित्सालयांना जोडून शैक्षणिक अभ्यासक्रम देण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास दूधवाढीसोबतच रोजगारीचे प्रश्न कमी होण्यास मदत होईल.
‘संपन्न कृषी-सुविधायुक्त गाव-समर्थ भारत’ ही घोषणा भारतीय किसान संघाने दिली आहे. भारत हा खेड्यांनी बनलेला देश असल्याने खेडी सोयपूर्ण झाली तर देशातील बरेचशे प्रश्न मिटतील. यासाठी गावातील अर्थकारणाचा आधार असलेली शेती संपन्न व शेतकरी सुखी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ, योग्य तंत्रज्ञान व सुविधांचा उपलब्धता व उत्पादनाला योग्य दर देणारी बाजार व्यवस्था असणे गरजेचे आहे. पण हे सर्व करण्यासाठी एकट्या-दुकट्याचे प्रयत्न फार तोकडे आहे. समाजाने याला महत्त्व देऊन आपली पुढची पिढी या क्षेत्राकडे वळेल यासाठी त्यांना शेती व ग्रामीण उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे व सरकारनेही याला आधार दिला पाहिजे व जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी असे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतानात चांगले, गुणात्मक शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली पाहिजे.