दवर्ली येथे एलन रॉड्रीगीश यांच्या बंगल्यावर शनिवारी पहाटे आठ जणांनी दरोडा घालून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच आय-१० ही कार व सुझुकी स्कूटर चोरांनी पळवून नेण्याची घटना घडली. या दोरोड्यामुळे त्या भागात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पंधरा दिवसांपूर्वी आर्ले येथील खाण ब्यूरोच्या गाळ्यातील डॉ. योगेश काळे यांच्या घरात घुसून लाखो रुपयांचा ऐवज पळवून नेण्याचा घटना घडली होती.एकूण सात लाख बारा हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी पळवला. सुमारे एक तास दरोडेखोर त्यांच्या घरात होते. घरातील माणसांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी गप्प केले व चोरी करून झाल्यानंतर विदेशी दारुवर येथेच्छ ताव मारून ते परतले. ही घटना पहाटे ३ ते ४ वा. दरम्यान घडली, अशक्ष माहिती पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली.
चौगुले महाविद्यालयाचे प्राध्यापक एलन रॉड्रीगीश दवर्ली येथे यामाहा शोरुमजवळ बंगल्यात, पत्नी इरा व दोन मुलांसह राहतात. दरोडा पडला तेव्हा एलन व पत्नी एका खोलीत तर मुले दुसर्या खोलीत झोपली होती. दरोडेखोरांनी खिडकीचा बाहेरील दरवाजा तोडला व स्क्रू काढून खिडकीचे गज काढले व आत प्रवेश केला. येताना लाकडी कुंपणाचे दंडुके त्यांनी हातात घेतले होते. सुरा, स्क्रू ड्रायव्हरही त्यांचा हातात होता. दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील होते व त्यांनी तोंडावर बुरखा घातला होता. ते हिंदी बोलत होते असे एलन रॉड्रिगीश यांनी सांगितले.
पहाटे ३ वा. ते आत घुसले व सरळ एलन यांच्या खोलीत येऊन त्यानी गप्प राहण्यास सांगितले नपेक्षा ठार मारू अशी धमकी दिली. तुमच्याजवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम तेवढी द्या, असे ते म्हणाले. त्या अगोदर त्यांनी सर्व कपाटे धुंडाळून पाहिली पण काहीच सापडले नाही. त्यानी जबरदस्ती करताच एलन व त्यांच्या पत्नीने अंगठ्या, सोनसाखळी काढऊन दिली. शिवाय रोख ७ हजार रुपये व पाकिटातील ३.५ हजार रुपये दिले. त्यानंतर दरोडेखोर त्या दोघांना घेऊन मुलांच्या खोलीत गेले व त्या खोलीत मुलांच्या पर्समध्ये १५०० रुपये होते ते घेतले. इतक्यात कपटातील विदेशी दारूच्या बाटल्या त्यांनी पाहिल्या व सर्वजण बसून येथेच्छ दारू प्याले. जाताना त्यांनी गॅरेजमध्ये असलेले रुपेरी रंगाची जीए ०८ के ८५९० ही ग्रॅण्ड आय १० कार व जी ए ०८ पी १४४३ जी सुझुकी स्कूटर घेतली व ते पसार झाले. ते गेल्यानंतर पहाटे पोलिसांना हे वृत्त समजले. मायणा कुडतरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक हरीष मडकईकर यांनी जाऊन तेथे पाहणी केली. त्यानंतर उपअधीक्षक मोहन नाईक, अधीक्षक शेखर प्रभुदेसाई क्राईम बँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप, निरीक्षक संतोष चोडणकर, डीआयजी आर. रंगनाथन यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना आणून तपास करण्यात आला. पोलिसांनी गतीने तपास सुरू केल्याचे सांगितले.
पेड-सुरावली येथेही घरफोडी
पेड सुरावली येथील गीतांजली नायक यांच्या घरात घुसून चोरट्यांनी ८ लाख रु.चा ऐवज लांबवला. ही घटनाही शनिवारी पहाटे ३.३० ते ४ वा. दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी किचनचे दार तोडून आत प्रवेश केला व एक लाख रु. रोख, विदेशी चलन – १ हजार धिरम व ५०० अमेरिकी डॉलर्स तसेच दागिने मिळून ८ लाख रुपयांचा ऐवज लुटला.
काल दरोडा पडला ते दवर्लीतील ठिकाण या चोरीच्या ठिकाणाहून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर आहे.