वरुणापुरी मांगूरहिल वास्को येथे राष्ट्रीय चौपदरी महमार्गाच्या बाजूला पुन्हा बांधलेल्या झोपड्या पुन्हा एकदा कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आल्या. येथील राष्ट्रीय चौपदरी महामार्गावरील वरुणापुरी गेटजवळ असलेल्या बेकायदेशीर बांधकामे व गोठे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व दक्षिण जिल्हा प्रशासनाने कारवाई करून तीन महिन्याअगोदर जमीनदोस्त केल्या होत्या. या झोपड्यात बिगर गोमंतकीय बिहारी लोक राहत असत तसेच ते गुरांना बांधून ठेवत असत व आपला दुग्ध व्यवसाय चालवायचे तसेच या ठिकाणी नाफ्ता लाईन असल्याने येथे गवताच्या गंजीला एखादी आग लागली तर मोठा अनर्थ ओढवू शकतो. हे भैया लोक इथे गुरांना डासांचा त्रास होऊ नये म्हणून धूरी घालत असत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दोन वेळा या झोपडपट्ट्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर गुरांचा मालक यादव याने पुन्हा तिथल्या तिथे आपला व्यवसाय चालू केला. तसेच झोपड्या बांधून गुरांना तेथे बांधायला सुरुवात केली आहे. येथे पाण्याचे कनेक्शन असलेले आढळले पण त्याला बिल येत नसल्याचे सदर मालकाने सांगितले. गेली चार वर्षे सदर पाणी विना परवाना तसेच फूकटच वापरत असल्याचे आढळून आले. आजची कारवाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक सी. ओ. पी. फुर्तादो तसेच मुरगांव नगरपालिकेचे संयुक्त मामलेदार विनोद दलाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.