‘व्हिसा ऑन अरायव्हल’ मुळे पर्यटकांची संख्या दुप्पट होणार

0
83

सुविधेचा शुभारंभ; ४३ देशांतील प्रवाशांना सुविधा
काल रात्री १२ वाजल्यापासून दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांना गोव्यात आगमनानंतर ई- व्हिसा देण्याची सुविधा (व्हिसा ऑन अरायव्हल) सुरू करण्यात आली असून या सुविधेमुळे पुढील चार वर्षात येथील विदेशी पर्यटकांची संख्या पाच लाखांवरून दहा लाखांवर पोचेल, असा विश्‍वास पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.केंद्र सरकारने गोव्यासह दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बँगळूर, कोची, त्रिवेंद्रम या नऊ विमानतळांवर वरील सुविधा सुरू केली आहे. दाबोळी विमानतळावर वरील सुविधा उपलब्ध करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न होता, असे पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, जर्मनी, रशिया, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, केनया, लाओस, कोंबोडिया, कूक आयलंड, लक्सीमबर्ग, मोरिशीयस, म्यानमार, न्युझिलंड, सिंगापूर, थायलंड, नावस, नियू आयलँड, नार्वे, ओमन, पालास, पालेस्टा ईन, फिलिपाईनस, रिपब्लीक ऑफ कोरिया, रशियासह जगातील ४३ देशांतील पर्यटकांसाठी ई-व्हिसा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्र्यांचे आभार मानीत असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. पुढील काळात आणखी काही देशांतील पर्यटकांसाठी वरील सुविधा उपलब्ध होईल. यापूर्वी विदेशी पर्यटकांना गोव्यातील सहलीचे नियोजन करण्यासाठी किमान एक महिनाआधी तयारी करावी लागत होती. आता चार दिवसांपूर्वी तयारी केली तरी चालेल, असे नीलेश काब्राल यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांची भेट घेऊन केंद्रीय वित्त सहाय्य मिळविण्याच्या प्रस्तावावर चर्चा केल्याचे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले.