बाबा आमटे कुटुंबियांबरोबर आपले गेल्या ४० वर्षांपासून संबंध आहेत. अभिनेता बनण्यापूर्वीच आपण बाबांच्या संपर्कात होतो. त्यांच्या समाजकार्यात त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण त्यांच्याकडे रहायलाही गेलो होतो. पण माझा पिंड हा नटाचा असल्याने मी अभिनय क्षेत्रात जाऊन नाव कमवावे अशी सूचना करून बाबांनी आपणाला परत पाठवल्याचे नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर सांगितले.समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘प्रकाश आमटे-धी रियल हिरो’ हा चित्रपट इफ्फीत दाखवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काल समृद्धी पोरे, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांची काल येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली असता नाना पाटेकर यांनी वरील माहिती दिली.
हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा यासाठी आपण या चित्रपटाचे प्रोमेशन करणार असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.
‘प्रकाश बाबा आमटे-धी रियल हिरो’ हा चित्रपट लवकरच हिंदीतही येणार असून त्याच्या वितरणाची हिस्सेदारी आपणाला मिळालेली आहे. मात्र, त्यातून मिळालेला सर्व पैसा प्रकाश आमटे यांना समाजकार्यासाठी देणार असल्याचे नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितले. बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण जीवन कुष्ठरोग्यांच्या सेवेत खर्च केले. आता त्यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे हेही त्यांचा वारसा पुढे नेत असून त्यांच्या स्नुषाही त्यांना या समाजकार्यासाठी साथ देत आहेत. आता त्यांची तिसरी पिढीही हा वारसा पुढे नेण्याच्या तयारीत असून या सर्वांवर एक-एक स्वतंत्र चित्रपट होऊ शकेल, असे नाना म्हणाले. सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी हेमलकसा येथे ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटासाठी तेथील आदिवासींबरोबर काम करताना आलेले अनुभव सांगितले.
‘बाबा आमटेंवर चित्रपट बनवणार’
कुष्ठरोगी लोकांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले महान समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्यावर आपण एक चित्रपट करण्याचा विचार करीत असून त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बाबा आमटे यांच्या जीवनाविषयीची माहिती गोळा करीत असल्याचे नाना पाटेकर यांनी यांनी सांगितले.