सध्या आफ्रिकेत प्रादुर्भाव वाढलेल्या महागंभीर अशा ‘इबोला’ आजाराचा आढावा काल सचिवालयात आरोग्य सचिव, व आरोग्य आयुक्त यांच्या उपस्थितीतील बैठकीत घेण्यात आला. गोव्यात ‘इबोला’ आढळून आल्यास त्याच्या मुकाबल्याची काय सज्जता आहे, यासंबंधीची चर्चा झाली. दरम्यान, अद्यापपर्यंत गोव्यासह संपूर्ण भारतात कुठेही इबोलाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तसेच २३ नोव्हेंबर २०१४पासून इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांतून कुणीही भारतात प्रवास करून आलेला नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान, इबोलासंबंधी प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच फोंड्याच्या जिल्हा इस्पितळात करण्यात आले होते. त्यात अटेंड्ट, चालक व सफाई कर्मचारी मिळून ९८ जण सहभागी झाले होते.