ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे ३.३० वा. अल्प आजारानंतर निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन पूत्र असा परिवार आहे. माजी केंद्रीय राज्य मंत्री मिलिंद देवरा यांचे ते वडील होत. देवरा हे एक जनमानसात मिसळणारे नेते होते, त्यांच्या निधनाने दु:ख होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. आपण रविवारी त्यांच्या परिवारजनांकडे देवरा यांची विचारपूस केली होती असे पंतप्रधानांनी सांगितले.अर्थशास्त्र पदवीधर देवरा हे १९७७-७८ काळात मुंबईचे महापौर होते. त्यानंतर वीस वर्षे ते कॉंग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते. दक्षिण मुंबई मतदारसंघातून ते लोकसभा खासदार बनले होते. केंद्रात पेट्रोलियम मंत्रीपद त्यांना लाभले होते. गांधी परिवाराचे निकटवर्ती समजल्या जाणार्या देवरा यांच्या अंत्यविधीवेळी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल, प्रियांका, रॉबर्ट वडेरा उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.