भाजपला सत्तेवर आणण्याचे आवाहन
काश्मीरला लुटलेल्या दोन कुटुंबांना काश्मीरी जनतेने फेकून द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आपल्या पहिल्या सभेत बोलताना केले. मात्र ही कुटुंबे अब्दुल्ला की मुफ्ती याबाबत नामोल्लेख त्यांनी केला नाही.जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचे सांगून त्यांनी केवळ दोन कुटुंबांनीच या राज्यात राज्य करायचे काय असा सवाल केला. या दोन कुटुंबांमध्ये एक अलिखित करार आहे. एक कुटुंब पाच वर्षे लूट करते व नंतर त्याला जनता फेकून देते आणि दुसरे कुटुंब तशीच लूट सुरू करते असे मोदी म्हणाले. एक प्रकारे पाच वर्षे राज्याची लूट करण्याचा करारच या कुटुंबांमध्ये झाला असल्याची टीका त्यांनी केली.
भाजप सरकारविरुद्ध खोटारडी मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. निर्वासितांबद्दल भाजपला कोणतीही फिकिर नसल्याचा आरोप विरोधक करतात याकडे लक्ष वेधून त्यांनी स्पष्ट केले की भाजप सरकार प्रत्येक निर्वासितापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राला उर्जितावस्था आणण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले. तसेच जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने तेथे आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आपल्याला काश्मीरविषयी आत्यंतिक जिव्हाळा आहे आणि या राज्याचा विकास हा आपला मंत्र असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्यासाठी राज्यात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘लोकशाही, मानवता व काश्मिरियत’ हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे असे ते म्हणाले.