– बबन भगत
डुंब भरलेलं प्रचंड मोठं इनडोअर स्टेडियम. त्यात सर्व वयोगटातील लोकांचा भरणा. काहीजण तर तान्हुल्यांनाही कडेवर घेऊन आलेले. वातावरणात एका प्रकारचा जल्लोष भरून राहिलेला. सहसा कधी निमिषमात्रही पहायला न मिळणार्या व्यक्ती आज जवळून याची डोळी पहायला मिळणार, याचा आनंद व उत्कंठा सर्वांना लागून राहिलेली. दुपारचे ३ वाजल्यापासूनच हजारो लोक वाट पहात थांबलेले.अन् लोक ज्या व्यक्तीची वाट पहात होते त्यापैकी एक व्यक्ती काळ्या जोधपूरी सुटातून स्टेडियममध्ये अवतरते. नेमका कोण आला कुणाला काही कळत नाही. सगळे प्रेक्षक एकदम उठून उभे राहतात. आपण ज्या दिग्गजांची वाट पहात थांबलोय त्यातील एक अवतरला हे त्यांना कळलेलं असतं. अन् मग जल्लोष सुरु होतो, अमिताभ आला, सर्वांना एकाच वेळी त्याला डोळे भरून पहायचं असतं. आतापर्यंत आपल्या ज्या सर्वांत आवडत्या कलाकाराला विविध रुपात पडद्यावर पाहिलेले असतं तो प्रत्यक्ष कसा दिसतो हे पाहण्यासाठी जणू तेथे स्पर्धाच लागते. काही जण अगदी पुढे जाऊन गर्दी करतात. त्यामुळे मागे बसलेल्या लोकांना काहीही दिसेनासं होतं. आणि शेवटी मग हळूहळू सर्वांना त्याचं जरासं काही होईना दर्शन होऊ लागलं.
तीच ऐट, तोच डौलदारपणा, तेच भावूक डोळे, तेच स्मित, तेच एक पाय वाकडा टाकून आपल्या विशिष्ट शैलीत बसणं, सगळं अगदी तसं, पडद्यावर दिसतं तसं. अन् मग ४.३० वाजता पुन्हा जल्लोष सुरु होतो.
आभाळाएवढ्या अमिताभनंतर सागराएवढा शिवाजी गायकवाड आलेला असतो. शिवाजी गायकवाड म्हणजे दाक्षिणात्य लोकांचा महानायक रजनीकांत आणि अवघ्या महाराष्ट्राचा मर्द मराठा. सिनेमात अत्यंत रुबाबदार दिसणारा, डोक्यावर छान केस मिरवणार्या रजनीकांत याला प्रत्यक्षात मात्र टक्कल पडलेलं आहे. रंगाने तो काळा आहे. पण सार्वजनिक ठिकाणी तो तसाच वावरतो. डोक्यावर विग न घालता, मेकअप न करता. गरिबाना मदत करण्यासाठी गावची गाव दत्तक घेणारा हा महानायक अत्यंत हळवा आहे. काल पुरस्कारासाठी त्याला व्यासपीठावर बोलावलं गेलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले. त्याचं इफ्फी स्थळी आगमन झालं तेव्हाच अमिताभनं त्याला आलिंगन दिलं होतं, पण पुरस्कार दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची गळाभेट झाली. या दोघा महानायकांनी एकत्र कामही केलेलं आहे. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असून स्वतःच्या मेहनतीवर महानायक बनलेले आहेत.
तर अशा या दोघा दिग्गजांना काल एकत्र पाहणं हा एक वेगळाच सोहळा होता. एखाद्या सोहळ्याला ‘चार चॉंद’ लागणे म्हणजे काय असते ते काल प्रेक्षकांना अनुभवता आलं.
शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०१४
एक सुंदर एकादशी
इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा या महत्वाच्या विभागाची सुरूवात काल ‘एलिझाबेथ एकादशी’ या मराठी चित्रपटाने झाली. मराठीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा चित्रपट.
भारतातील एक महत्वाचे असे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरची या चित्रपटाला सुंदर पार्श्वभूमी लाभलेली आहे. भारतात एका बाजूने जसे गर्भश्रीमंत, धनिक आहेत तसेच दुसर्या बाजूने पैशांची चणचण असलेला एक मोठा समाजही आहे. त्यांची दु:खे, व्यथा वेगळ्या असून त्यांच्या समस्यांना अंत नाही. अशाच एका कुटुंबाचे दर्शन एलिझाबेथ एकादशी घडवतो. आर्थिक विवंचनेत असलेली माता व १०-१२ वर्षांचा असलेला तिचा मुलगा ज्ञानेश यांच्याभोवती चित्रपटाची कथा फिरते. कर्ज फेडण्याच्या विवंचनेत असलेल्या आपल्या आईला त्याला मदत करायचीच. कारण कर्ज फेडण्यासाठी आपली आई ‘एलिझाबेथ’ ही आपली सायकल विकेल याची त्याला धास्ती लागून राहिलेली असते. आता या जगात नसलेल्या आपल्या वडिलांनी स्वत: बनवलेल्या या सायकलवर त्याचा कोण जीव असतो. त्याच्या छोट्या बहिणीचेही एलिझाबेथवर जीवापाड प्रेम असते. ज्ञानेश हा तर हुशार, चुणचुणीत असा मुलगा असतो. तीर्थक्षेत्र परिसरात राहणार्या ज्ञानेशला देव व धर्माविषयी जसं प्रेम व कुतूहल असतं तसंच विज्ञानाविषयीही आकर्षण असतं. वैज्ञानिक न्यूटनचा फोटोही त्यांच्या घरात असतो व तो देवदेवतांच्या फोटोंच्या बाजूला लावलेला असतो.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या आपल्या आईला पैसे मिळवून देण्यासाठी ज्ञानेश जत्रेत बांगड्या विकण्याचे दुकान थाटतो. त्याचे मित्र व बहिणही त्यात त्याला साथ देतात. या दुकानातून चांगली कमाई होता होता कथेला एक कलाटणी मिळते. सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केल्यामुळे अडकलेले काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते जत्रेत दंगा करतात आणि ज्ञानेशचा बांगड्याचा स्टॉल उद्ध्वस्त होतो. त्यामुळे बांगड्या ज्या दुकानदाराकडून उधारीवर आणल्या होत्या त्या दुकानदाराला फसवण्यासाठी लबाडी करण्याचा एक मार्ग ज्ञानेशचा मित्र त्याला शिकवतो आणि ज्ञानेश अडचणीत येतो. पण इथपर्यंत अत्यंत कलात्मक पद्धतीने पुढे चाललेल्या या चित्रपटाचा शेवट मात्र सुखांत करण्यात आलेला आहे. जाणुनबुजून तो तसा केल्यासारखा वाटतो. त्यामुळे चित्रपटाची कलात्मक पातळी मात्र जराशी घसरल्यासारखी वाटते.
परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन त्यांच्या कारकिर्दीला शोभेसंच आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी खूप वेगळ्या प्रकारची कथा लिहिलेली असून धर्म व विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.आपण लहानपणी दिवसाला तीन-तीन चित्रपट पहायचो.
सोमवार दि. २४ नोव्हेंबर २०१४
वोम्ब ऑन रेन्ट
भारतात प्रचंड लोकसंख्या आहे आणि त्याच्या जोडीला गरिबी, दारिद्य्रही. देशातल्या कानाकोपर्यातील लोक कसे जगतात, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचा विचारही करायची उसंत आमच्याकडे नसते किंवा त्याची गरजही आम्हांला वाटत नाही. महागाईचा आगडोंब देशभरात उसळलेला आहे आणि या महागाईशी ताळमेळ घालण्यासाठी पैसे कसे कमवायचे हा प्रश्न देशातील करोडो लोकांना रोज सतावत असतो.
भारतातील झोपडपट्टीत राहणार्या लोकांचे जीवन तर अगदीच हलाखीचे आहे. जन्माला आलो म्हणून जगायचे असेच त्यांचे जीवन आहे. या अशा लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून धनिक लोक त्यांना आपल्या फायद्यासाठी वापरून घेत असतात. पैशांसाठी मूत्रपिंडासारखे आपले अवयव विकणारे लोकही कमी नाहीत.
देश-विदेशात अशाही काही धनिक बायका आहेत, ज्यांना मूल तर हवे आहे. पण विशिष्ट कारणांसाठी त्यांना ते स्वत:च्या गर्भात वाढवायचे नाही. विज्ञानाने अशा बायकांसाठी आता एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. भाड्याचे गर्भाशय किंवा भाडोत्री मातृत्व हा तो मार्ग आहे. अशा सेरोगेट माता बनून पैेसे कमावणे हा एक नवा मोठा धंदा कसा भारतात फोफावू लागलेला आहे, त्याचे चित्रण काल इफ्फीतील ‘वोम्ब ऑन रेंट’ या माहितीपटातून पहायला मिळाले. २००४ साली भाडोत्री म्हणजेच ‘सेरोगेट’ मातेने जन्म दिलेल्या पहिल्या मुलाचा भारतात जन्म झाला. आणि आता १० वर्षांच्या काळात सहा अब्ज डॉलर्स एवढ्यावर हा व्यवसाय येऊन पोहोचलेला आहे. विशेष करून विदेशी जोडपी मोठ्या प्रमाणात अशा सेरोगेट मातांच्या शोधात भारतात येऊ लागलेल्या आहेत. त्यात अमेरिका व पाश्चिमात्य जोडप्यांचा आकडा लक्षणीय असा आहे. एका मुलाला जन्म देण्यासाठी भारतातील झोपडपट्ट्यातील गरिब महिलांना लाखो रु. दिले जातात. खरी माता आपले अंडबीज व पिता आपले वीर्य देतो. त्यांचा मिलाफ प्रयोगशाळेत केला जातो व नंतर गर्भ भाडोत्री मातेच्या गर्भात वाढवला जातो. त्यासाठी भाडोत्री मातेवर इंजेक्शन्सचा मारा केला जातो. सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. हा एक मोठा धंदा बनल्याने त्यासाठी डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा अशी एक मोठी साखळीच निर्माण झालेली आहे. एका मुलाला जन्म देण्यासाठी भाडोत्री मातेला ३ ते ४ लाख रु.पर्यंत दिले जातात. तर या साखळीत असलेली हॉस्पिटले, प्रयोगशाळा यांची कशी चांदी झालेली आहे हे या लघुपटातून दाखवण्यात आलेले आहे. शिवाय पूर्वीच भाडोत्री माता बनलेल्या महिला अन्य महिलांना या व्यवसायात आणून स्वत: कशी दलाली करतात तेही या लघुपटात पहायला मिळते.
मंगळवार दि. २५ नोव्हेंबर २०१४
हसण्या-रडण्याचा खेळ – सलाम सिनेमा
सिनेमांचे असे हे वेड फक्त भारतीयांनाच आहे असे नाही. जगभरातील लोकांना सिनेमा भुरळ घालीत असतो. भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, इराण अशा कित्येक देशातील लोक हे सिनेरसिक आहेत. मोहसिन मखबलबाफ या इराणमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकाने एकदा आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी आपणाला १०० कलाकार हवेत अशी जाहिरात वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली होती. आणि त्यांच्या घरासमोर ५ हजार लोकांचा प्रचंड जनसमुदाय स्क्रिन टेस्टसाठी जमला. चेंगराचेंगरी होण्यासारखी स्थिती निर्माण झाली. आणि मोहसिननं ठरवलं की हाच माझ्या सिनेमाचा विषय आहे. त्याच जनसमुदायाचं त्यानं चित्रीकरण केलं. त्यातील काही डझन लोकांचं स्क्रिन टेस्ट त्यांनी घेतली आणि त्याचाच सिनेमा तयार केला. स्क्रिन स्टेस्टसाठी आलेल्या लोकांना हसण्याचा व रडण्याचा अभिनय करायचा असतो. बरेच जण रडण्यास नकार देतात. म्हणतात रडणं जमणार नाही. हसण्याचा अभिनय करण्याची त्यांची तयारी असते. पण प्रत्यक्ष हसण्याचा अभिनय करण्याची वेळ येते तेव्हा त्यांची दातखिळीच बसते. रडण्याएवढंच तेही कठीण असतं हे त्यांना त्यावेळी कळतं. ऑडिशनसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचं सुंदर चित्रण या चित्रपटातून चित्रीत करण्यात आलेलं आहे.
चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची स्क्रिन टेस्ट घेता घेता हा चित्रपट पुढं सरकतो. ऑडिशनसाठी आलेल्या काही व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याची संधीही हा चित्रपट देतो. स्क्रिन टेस्ट चालू असताना त्यांना विविध प्रश्न विचारले जातात. तुला अभिनय का करायचाय? अभिनेता होण्याऐवजी चांगला माणूस होण्याचा पर्याय दिला तर तुम्ही कोणता पर्याय स्वीकारणार? अशा प्रकारचे ते प्रश्न असतात. विविध व्यक्तींना प्रश्न विचारल्यानंतर ते त्यांच्या स्वभावानुसार त्या प्रश्नाचं उत्तर देतात. काही जणांना खोटं खोटं त्यांना संधी नाकारण्यात आल्याचं सांगितलं जातं. अन् सर्वात शेवटी कळतं की ती स्क्रिन टेस्ट म्हणजेच प्रत्यक्ष त्या चित्रपटासाठीचं चित्रीकरण असतं.
या चित्रपटातील काही प्रसंग विनोदी आहेत. तर काही डोळे पाणावणारे आहेत. स्क्रिन टेस्टच्या नावाखाली हसण्या-रडण्याचा जो खेळ पात्रांकडून करून घेतला जातो त्याला तोड नाही. चित्रपट मनोरंजनही करीत नाही आणि कंटाळाही आणत नाही. अत्यंत साध्या पद्धतीनं चार भिंतीआडच चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. मानवी भावभावना, इच्छा, आकांक्षा याचं दर्शनच एकाप्रकारे हा चित्रपट घडवून जातो. म्हणूनच ‘सलाम सिनेमा’ या इराणी सिनेमाला चित्रपटगृहातून बाहेर पडताना सलाम करावा वाटल्याशिवाय राहवत नाही.
बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०१४
हमारा आसमान
‘हम बहुत छोटीसी जिंदगी जिते है| हमारा आसमान भी बहुत छोटा होता है| हम अपने बिवी-बच्चों के सिवा किसीका भी नही सोचते|’ हे उद्गार आहेत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे. नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रकाश बाबा आमटे दी रियल हिरो’ हा चित्रपट इफ्फीत दाखवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काल या चित्रपटाच्या दिग्दर्शक समृद्धी पोरे, नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद्वारे संवाद साधला.
एका बाजूने बाबा आमटे यांचे पुत्र प्रकाश आमटे व विकास आमटे यांच्यासारखे समाजसेवक मोठे समाजकार्य करीत असताना संपूर्ण समाज मात्र स्वार्थी व स्वत:पुरताच विचार करणारा बनलेला आहे, हे सांगताना नाना पाटेकर यांनी वरील उद्गार काढले.
सफाई कामगारांचे नेते बनल्यानंतर एके दिवशी बाबा आमटे हे डोक्यावर कचर्याची टोपली घेऊन चालले होते. चालता चालता वाटेत त्यांना एक कुष्ठरोगी दिसला. त्याच्या संपूर्ण अंगावर जखमा होत्या व त्यातून किडे बाहेर येत होते. त्या कुष्ठरोगी माणसाला बघून घाबरलेले बाबा आमटे यांनी, कचर्याची टोपली तेथेच टाकून तेथून पळ काढला. पण त्या घटनेनंतर त्यांचे जीवनच बदलून गेले. त्या दिवसापासून त्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. बाबा आमटे यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी माहिती संकलित करताना ज्या गोष्टी कळल्या, त्या आतून हलवून टाकण्यासारख्या होत्या. ज्या कुष्ठरोगी माणसाजवळ जायला लोक घाबरतात अशा रोग्यांची २४ तास सेवा करणे हे सोपे काम नाही. बाबांचे पुत्र प्रकाश आमटे हे ज्या हेमलकसा या आदिवासींच्या भागात काम करीत आहेत. तो भाग तर अत्यंत दुर्गम असा आहे. तेथील आदिवासींच्या अंगावर धड कपडेही नसतात. नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेला हा भाग आहे. सगळ्या दृष्टीने प्रतिकूल अशी परिस्थिती. मेंदुज्वराचा तेथे फैलाव झालेला आहे. अशा परिस्थितीत प्रकाश आमटे हे आपली पत्नी मंदा व दोन कोवळ्या मुलांसह तेथे कायमचे स्थायिक होऊन तेथील आदिवासींची सेवा करण्यासाठी निघून गेले. आमटे कुटुंबीयांसारख्या लोकांना हे असले महान कार्य करण्यासाठी बळ कुठून मिळते तेच कळत नसल्याचे नाना पाटेकर यांचे म्हणणे होते.
आज भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आमटे कुटूंब हे एक आदर्श ठरलेले असून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला हवा असे नाना यांचे म्हणणे होते. भारत देशातील लोक अजून जाती-जाती, धर्म-पंथ यात अडकून पडल्याने देशाची व समाजाची उन्नती होऊ शकत नाही. आंतरजातीय विवाह करू पाहणार्या मुलींना ‘ऑनर किलिंग’ला सामोरे जावे लागते, हे सगळे थांबायला हवे. आमटे कुटुंबीयांचा आदर्श घेतल्यास समाजाची उन्नतीच होणार असल्याचे नाना पाटेकर यांचे म्हणणे आहे.
चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून लोकांना शिक्षित करणे त्यांच्यात असलेला संकुलित दृष्टीकोन नाहीसा करणे हेच तर चित्रपटाचे काम आहे. इफ्फीचा त्यासाठी हातभार लागल्यास फार काही साध्य झाले असेच म्हणावे लागेल.
गुरुवार दि. २७ नोव्हेंबर २०१४
शेतकर्यांच्या आत्महत्या आणि ‘कॅन्डल्स इन दी विंड’
‘असे म्हणतात की आपला देश हा दोन भागात विभागला गेलेला आहे. हे दोन विभाग म्हणजे भारत व इंडिया. दारिद्य्रात खितपत पडलेले व गरीब लोक भारतात म्हणजेच देशातील ग्रामीण भागात राहतात आणि महानगरातही राहतात. मात्र, या महानगरात एक इंडियाही आहे. श्रीमंत लोकांची. कॅसिनोमध्ये, पंचतारांकित हॉटेलात जाणार्या, मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घेणार्या व दिवसाला हजारो-लाखो रु. खर्च करणार्या लोकांची ही इंडिया आहे. हे लोक भरपेट जेवतात, चैन करतात, पण आपण जेवत असलेले अन्न ज्या शेतकर्यांनी पिकवलेले आहे, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ते कर्जबाजारी बनलेले आहे व जीवनाला कंटाळून कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाऊन आत्महत्या करीत आहेत. याची जाणीव या लोकांना नाही किंवा त्यांच्याबाबत काही जाणून घ्यावे असे त्यांना कधी वाटतही नाही.
गेल्या १६ वर्षांत भारतातील ५ लाख शेतकर्यांनी कर्जबाजारी बनल्याने आत्महत्या केलेली आहे. (गोव्यातील लोकसंख्येच्या पाव टक्का एवढा हा आकडा झाला.) डोकं सुन्न करील अशी ही शेतकर्यांची कहाणी सांगत होत्या, कविता बहल. कविता बहल या ‘कॅन्डल्स इन दी विंड’ या लघुपटाच्या दिग्दर्शिका आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या निधनावर हा लघुपट आधारलेला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शेतकरी आत्महत्या करतात. पण त्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज नाहीसं होत नाही. बँका कर्जवसुलीसाठी त्यांच्या विधवांच्या मागे लागतात. या विधवांवर आपल्या मुलांची तसेच वयोवृद्ध सासू-सासर्यांची जबाबदारी येऊन पडते. रोजगाराचं कसलंच साधन नसतं. नवर्याने आत्महत्या केल्याने मोठा आधार नाहीसा झालेला असतो. दु:ख, व्यथा, कुटुंबाची जबाबदारी व कर्जाचा तणाव आणि पोटापाण्याची समस्या अशा विचित्र परिस्थितीत या विधवा अडकतात. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही, असे भयानक चित्र सध्या देशातील कृषी क्षेत्रात आहे. शेतकर्यांसाठीच्या वेगवेगळ्या योजनांसाठी दरवर्षी अंदाजपत्रकात करोडो रुपयांची तरतूद केली जाते. मात्र सगळे पैसे जातात ते राजकारण्यांच्या खिशात.
आज देशात अन्नधान्यांचे, भाज्यांचे दर आकाशाला भिडलेले आहेत. त्यातून मिळणारा सगळा पैसा हा व्यापार्यांच्या खिशात जातो. कृषीदृष्ट्या पंजाब हे एक समृद्ध राज्य. पण त्या राज्यातील छोटे शेतकरीही आत्महत्या करू लागले आहेत. असे बहल यांनी सांगितले. या देशातील शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आत्महत्यांचे सत्र चालूच आहे. मात्र, या शेतकर्यांच्या मदतीला धावून यावं असं कुणालाही वाटत नाही. दरवर्षी इफ्फीत डोकं सुन्न करणारे असे लघुपट व चित्रपट पहायला मिळतात. त्यावर चर्चाही होते, पण या समस्या, प्रश्न मात्र तसेच राहतात. किंबहूना ते आणखी उग्ररुप धारण करतात. आणि इंडिया व भारत यांच्यातील दरी रुंदावत जाते.
शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०१४
कॅमेर्याची करामत
आपण सिनेमा पाहतो तो कॅमेर्याच्या डोळ्यातून. कॅमेराच आम्हांला चित्रपटाचे दर्शन घडवतो. आमच्या डोळ्यांसमोर एक वेगळं अद्भूत, विलक्षण असं जग उभं करतो. कधी ते वास्तववादी असतं तर कधी स्वप्नवत. पण ते पाहून आपण भारावून जातो. आपण अस्वस्थही होतो. कधी कधी आपण रडतोही आणि खुदकन हसतोही. ही जादू असते ती त्या कॅमेर्याची. पण त्या कॅमेर्यामागेही एक जादुई हात असतो तो म्हणजे छायाचित्रकाराचा हात. आपण त्याला कॅमेरामन म्हणतो. दिग्दर्शकाच्या ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ मधून कॅमेरामन आपणाला कुठे कुठे नेऊन आणतो. वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, त्यांची सुख-दुखे, त्यांच्या भाव-भावना, त्यांचा संघर्ष आपणाला चित्रपटातून पहायला मिळतो. हे सगळं प्रेक्षकांसमोर कसं ठेवायचं ते ठरवतो तो चित्रपटाचा दिग्दर्शक. पण त्यासाठी त्याला अभिनेत्यांची जशी गरज लागते तशीच त्याला एका प्रतिभावान अशा छायाचित्रकाराचीही गरज असते. कारण चित्रपटातील प्रत्येक दृश्य कोणत्या कोनातून कसे घ्यायचे हे दिग्दर्शकाबरोबरच कॅमेरामनला माहीत असावे लागते. किंबहूना कॅमेरामनकडे जादूई हात असेल तर प्रत्येक दृश्य वेगळीच उंची गाठू शकते.
भारतात काही दिग्गज असे छायाचित्रकार होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे व्ही. के. मूर्ती. वेंकटरामन् कृष्णमूर्ती हे त्यांचे पूर्ण नाव. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान दिग्दर्शक गुरुदत्त यांचे कॅमेरामन म्हणून त्यांना ओळखले जाते. गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’, ‘साहब बिवी और गुलाम’, ‘कागज के फूल’, ‘आरपार’, अशा सगळ्या चित्रपटांचे छायाचित्रत्रण केले ते श्री. मूर्ती यांनीच. भारतीय चित्रपटातील छायाचित्रणाचे उत्कृष्ट नमुने म्हणून या चित्रपटांकडे पाहिले जाते.
तर अशा या दिग्गज छायाचित्रकाराचे गेल्या ७ एप्रिलला निधन झाले. दादासाहेब फाळके हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार लाभलेले ते पहिले छायाचित्रकार. तर या वर्षी दिवंगत झालेल्या या प्रतिभावान छायाचित्रकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी इफ्फीतील श्रद्धांजली या विभागातून त्यांनी छायाचित्रण केलेला ‘काजल के फूल’ हा चित्रपट इफ्फीत दाखवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे एक शिष्य असलेले छायाचित्रकार व दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी काल पत्रकार परिषदेतून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर या महान कलाकाराविषयी पत्रकारांना व चित्रपट समीक्षकांना माहिती दिली. एक-एक दृश्य अप्रतिम व्हावे यासाठी मूर्ती हे प्रकाशयोजना कसे करायचे, कॅमेर्याच्या अँगल्सचा कसा वापर करायचे हे सांगताना गोविंद निहलानी भूतकाळात रमले. त्यांच्या छायाचित्रणामुळे गुरुदत्त यांचे चित्रपट ‘क्लासिकल’ बनवण्यास कसा हातभार लागला, त्याची तपशीलवार माहिती देतानाच आपण छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी कसा त्यांच्याकडे गेलो व त्याच दिवशी त्यांनी शिष्य बनवून आपणाला कसे कामाला जुंपले त्याची कहाणीही श्री. निहलानी यांनी यावेळी सांगितली. व्ही. के. मूर्ती यांच्यासारखे प्रतिभावंत शतकात एकदाच जन्म घेत असतात. आणि म्हणूनच त्यांचे काम पाहिल्यावर आपण भारावून गेल्याशिवाय राहत नाही.
शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०१४
ग्लॅमर, पैसा नसलेली लघुपटांची दुनिया
चित्रपटाशीच संबंधित पण ग्लॅमर नसलेला वेगळा विभाग म्हणजे लघुपट. लघुपट म्हणजे एखाद्या विषयाची तपशीलवार माहिती देणारी फिल्म. त्यासाठी अर्थातच संबंधित विषयावर संशोधन करणे क्रमप्राप्त ठरते. कित्येक वेळा वर्षानुवर्षे संशोधन करत व माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करूनही हवी ती सगळीच माहिती हाती लागतेच असे नाही. विदेशात तर एखाद्या लघुपटासाठी १० ते १२ वर्षांपर्यंतही संशोधन व अभ्यास करणारे अवलिया असतात. अन् मग जबरदस्त असा लघुपट जन्माला येतो. पण बर्याच वेळा स्क्रिप्ट तयार असतानाही घोडं अडतं. कारण लघुपट निर्मितीसाठी लाखो रुपयांची गजर असते. तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी असलेले निर्माते अथवा फायनान्सर्स मिळणेही कठीण गोष्ट असते.
लघुपटासाठी खर्च केलेले पैसे वसूल होण्याची शक्यता फारच अंधुक असते. कारण जगभरातील कुठल्याही सिनेमागृहातून लघुपट दाखवले जात नाहीत. शिवाय हे लघुपट बघण्यासही खूपच कमी लोकांना रस असतो. एक तर ते चित्रपट महोत्सवात दाखवावे लागतात, अन्यथा ते विकत घेतील अशा वाहिन्यांचे दरवाजे ठोठवावे लागतात. पण तेथेही जाऊन काही साध्य होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे आज जगभरातील लघुपट दिग्दर्शकांची व निर्मात्यांची स्थिती दयनीय झालेली आहे.
पण खचून न जाता या सगळ्या समस्यांतून मार्ग काढून लघुपट निर्मिती कशी करता येईल याची माहिती लघुपट निर्मिती अथवा दिग्दर्शन करण्यात ज्यांना रस आहे त्यांना मिळावी यासाठी काल इफ्फीत एका मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले होते. ‘माय नेम इज सॉल्ट’ या लघुपटाचे निर्माते व कॅमेरामन लुझ कोनरमन यांनी घेतलेल्या या मास्टर क्लासचा विषय होता ‘डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग ऍण्ड पिचिंग’ म्हणजेच लघुपटाची निर्मिती कशी करावी व आपल्या लघुपटाचा विषय. त्यासाठी फायनान्स करण्यास इच्छुक असलेली कंपनी अथवा व्यक्ती यांच्यापुढे प्रभावीपणे कसा मांडावा. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कोनरमन म्हणाले की, लघुपटासाठीची प्रक्रिया एका रात्रीत पूर्ण करता येत नाही. ज्या विषयावर तुम्ही लघुपट करणार आहात त्याविषयीची सविस्तर माहिती तुम्हांला हवी. तसेच त्या विषयावर काम करण्याची आवड व इच्छाही हवी. तसेच तुम्ही तो कुणासाठी करता तेही महत्वाचे आहे. लघुपट एक तर ५२ मिनिटांचा असावा लागतो किंवा ७० ते ९० मिनिटांचा. मात्र, ६० ते ९० मिनिटांच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळणे मुश्किल असते. कारण तेवढ्या लांबीच्या लघुपटांसाठी या महोत्सवात वेळ नसतो.
लघुपटातून तुम्ही माहिती पुरवण्याचे काम करता. पण लघुपट म्हणजे निबंध नव्हे. लघुपटाची कहाणी सुंदर व सुरेलपणे सांगावी लागते. एकेकदा तर तुम्ही समाजातील ज्या घटकांवर लघुपट बनवता तो समाज जसा आहे त्याचा जसा वावर आहे तसे चित्रीकरण करावे लागते. कारण मुद्दामहून त्यांना अभिनय करायला लावल्यास पाहिजे ते हाती न गवसण्याची भीती असते. लघुपटांची एक जमेची बाजू म्हणजे त्यासाठी महागड्या स्टार मंडळीची गरज नसते. मात्र, स्क्रिप्ट चांगली असावी लागते.
आणखी सर्वांत महत्वाचे म्हणजे तुमच्या लघुपटाला निर्माता व फायनान्सर हवा असेल तर तो मिळवण्यासाठी लघुपटाचा पाच मिनिटांचा एक ‘ट्रेलर’ तयार करणे शहाणपणाचे ठरु शकते. ‘ट्रेलर’ पाहून तो आवडल्यास लघुपटासाठी निर्माता व फायनान्सर म्हणून एखादी कंपनी वा एखादी व्यक्ती पुढे येण्याची शक्यता असते.
लघुपट क्षेत्रात अमाप कष्ट आहेत. मात्र, पैसे मिळतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे ज्यांना समाजातील एखादी कहाणी अथवा समस्या लोकांपुढे आणण्याचे पेशन्स आहेत त्याच लोकांसाठी हे माध्यम आहे.