फ्रान्सिसना आरोग्य; महादेवना सहकार; मिकींना ग्रामीण विकास

0
135

नव्या मंत्र्यांना खातेवाटप
र्गृह, अर्थ, शिक्षण मुख्यमंत्र्यांकडेच ,  बहुतेक मंत्र्यांना पूर्वीचीच खाती
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप केले. खातेवाटपात किरकोळ बदल करताना मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या बहुतेकांना तीच खाती कायम ठेवली आहेत.मुख्यमंत्र्यांनी गृह, अर्थ, शिक्षण, कार्मिक, खाण व दक्षता ही महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मनाहर पर्रीकर मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे आरोग्य व पशु संवर्धन ही खाती होती. त्यापैकी आरोग्य खाते त्यांनी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे सोपवले आहे. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे असलेले नगर आणि नियोजन हे खातेही डिसोझा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. पर्रीकरांकडे होते ते कायदा खातेही आता डिसोझा सांभाळतील.
सुदीन ढवळीकर यांच्या खात्यात कोणताही बदल करण्यात आलेला नसून त्यांना पूर्वीचीच सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन व अपारंपरिक ऊर्जा ही खाती मिळाली आहेत.
चौथ्या क्रमांकावरील मंत्री दयानंद मांद्रेकर यांना पंचायत हे अतिरिक्त खाते मिळाले आहे. मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळात हे खाते लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे होते. त्याशिवाय मांद्रेकर यांना त्यांच्याकडे पूर्वी असलेली जल संसाधन, नागरी पुरवठा, कला आणि संस्कृती व भाववाढ नियंत्रण ही खाती देण्यात आली आहेत.
रमेश तवडकर यांना कृषी व पशुसंवर्धन ही दोन महत्त्वाची अतिरिक्त खाती मिळाली आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे पूर्वी असलेली क्रीडा व युवा व्यवहार, आदिवासी कल्याण व पशु संवर्धन व पशु चिकित्सा सेवा ही खाती त्यांना पुन्हा देण्यात आली आहेत.
मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात दीपक ढवळीकर यांच्याकडे असलेले सहकार खाते हे आता महादेव नाईक यांना देण्यात आले आहे. महादेव नाईक यांना पूर्वी त्यांच्याकडे असलेले उद्योग हे वजनदार खातेही परत मिळाले आहे. शिवाय समाज कल्याण खाते, हस्तकला ही खातीही राखण्यास त्यांना यश आले आहे. दिलीप परुळेकर यांच्या खात्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही किंवा त्यांना अतिरिक्त खातेही देण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे पूर्वी जी खाती होती ती म्हणजे पर्यटन व महिला आणि बालविकास व शिष्टाचार ही खाती त्यांना परत मिळाली आहेत. मिलिंद नाईक यांना त्यांच्याकडे पूर्वी असलेल्या महत्त्वाच्या वीज खात्याबरोबरच त्यांच्याकडे पूर्वी असलेले माहिती आणि प्रसिध्दी खाते देण्यात आले आहे. याशिवाय त्यांना राज्य वीज निरीक्षकालय, राजभाषा ही अतिरिक्त खाती त्यांना मिळाली आहेत. दीपक ढवळीकर यांच्याकडे असलेले सहकार हे महत्त्वाचे खाते काढून घेण्यात आले असून त्यांच्याकडे पूर्वी असलेले कारखाने आणि बाष्पक हे खाते त्यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे असलेले कारागिर प्रशिक्षण खाते त्यांना देण्यात आले आहे. मुद्रण आणि सामुग्री हेही खातेही ते सांभाळतील.
आवेर्तान फुर्तादो यांना पूर्वीचीच कामगार, आणि रोजगार व मच्छीमारी ही खाती देण्यात आली आहेत. अनिवासी भारतीय हे एक अतिरिक्त खाते त्यांना देण्यात आले आहे. एलिना साल्ढाणा यांना पूर्वीचीच वन आणि पर्यावरण ही खाती देण्यात आली असून वस्तू संग्रहालयही देण्यात आले आहे. पर्रीकर मंत्रिमंडळात नसलेले व पार्सेकर मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळालेले मिकी पाशेको यांना ग्रामीण विकास, पुरातत्व व पुराभिलेख ही खाती देण्यात आली आहेत.