* दीडशे खाटांची व्यवस्था
* दोन ऑपरेशन थिएटर्स
* आयसीयू विभाग
गोव्यात लवकरच सुसज्ज असे नवे दंत इस्पितळ उभे राहणार असल्याचे दंत महाविद्यालयाच्या मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विकास धुपर यांनी काल बांबोळी येथे दंत महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. शंभर ते दीडशे खाटांचे असे हे इस्पितळ असून ते सुसज्ज असे असेल. या इस्पितळात दोन मोठी ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग, कॅज्युएल्टी असे विभाग असतील. राज्यात अशा दंत इस्पितळांची गजर असल्याचे दिसून आल्याने सरकारने वर्षभरापूर्वीच या इस्पितळाचे काम सुरू केले होते. आता हे काम पूर्णत्वाकडे आलेले असून वर्षभरात इस्पितळ सुरू होऊ शकेल, असे डॉ. धुपर यांनी यावेळी स्पष्ट केले. दंत इस्पितळात महिन्याला सुमारे २५ हजार रुग्ण येत असतात. तसेच महिन्याला सुमारे ३०० मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येत असतात. त्यात तोंडाचा कर्करोग झालेले रुग्ण, जबडा व दात यात व्यंग असलेले रुग्ण, अपघातामुळे दात तुटून पडलेले रुग्ण, अपघातामुळे चेहर्याला गंभीर स्वरूपाची इजा झालेले रुग्ण. जन्मताच ओठ, नाक, चेहरा यात व्यंग असलेले रुग्ण आदींचा समावेश असतो. तोंडाचा कर्करोग झालेल्या काही रुग्णांचे दात काढावे लागतात. अशा शस्त्रक्रियाही यशस्वीपणे दंत इस्पितळात करण्यात येत असल्याचे डॉ. धुपर यांनी सांगितले.
दरम्यान, भारतातील ओरल व मेल्सिओकेशिएल सर्जन्स यांची ३९ वी एक परिषद १४ ते १६ नोव्हेंबर या दरम्यान गोव्यात होणार असून सिदाद-द-गोवा या पंचतारांकित हॉटेलात ती आयोजित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, हॉंगकॉंग, तुर्क आदी देशांतूनही या परिषदेला तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. १४०० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार असून १५ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टर हजेरी लावणार आहेत. या परिषदेत १३८ जण आपले पेपर सादर करणार आहेत.