इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे आयोजन
इन्स्ट्यिूट मिनेझिस ब्रागांझा राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त दि. १८ ते २४ नोव्हेंबरपर्यंत लुईस-दी-मिनेझिस ब्रागांझा व्याख्यानमालेसह भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात मुलाखत, पुस्तक चर्चा, काव्यावरती विशेष कार्यक्रम आदींचा समावेश आहे.दि. १८ रोजी सायंकाळी ४.३० वा. पुस्तक सप्ताहाचे व पुस्तक प्रदर्शनाचे एमईएस महाविद्यालय वास्कोचे निवृत्त प्राचार्य डॉ. हरिश्चंद्र नागवेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दुपारी ३ वा. उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावर अखिल गोवा वाचन स्पर्धा घेण्यात येईल. दि. १९ रोजी सकाळी ९.३० वा. बालश्री पुरस्कार प्राप्त शिवानी कुंकळीकर (पणजी), श्रेया टेंगसे (काणकोण), ज्युलियन रुबीन डिकॉस्ता यांची प्रकट मुलाखत व मुलांशी सुसंवाद होईल. सायंकाळी ४.३० वा. संस्थेच्या मासिक सहित्य चर्चेअंतर्गत मिमांसा कार्यक्रमात विठ्ठल गावस यांच्या ‘ओझे’ पुस्तकावर चर्चा होईल. ज्येष्ठ समिक्षक प्रा. एस. एस. नाडकर्णी हे अध्यक्षस्थानी असतील व नारायण महाले आणि डॉ. सचिन कांदोळकर हे साहित्यिक समिक्षात्मक विवेचन करतील.
दि. २० रोजी सायंकाळी ४.३० वा. ‘विचार… एक अविस्मरणीय काव्यानुभव’ हा काव्यविषयक आगळा कार्यक्रम पुणे येथील श्रुती तोडणकर व सहकारी सादर करतील. त्यात स्वत: तोडणकर यांच्यासमवेत समीर सावंत, मंदार चोलकर, श्रीपाद देशपांडे, प्राजक्ता देशमुख यांचा समावेश आहे. दि. २१ रोजी सकाळी ९.३० वा. अखिल गोवा स्तरावर आंतर विद्यालयीन ‘स्पेलिंग’ स्पर्धा होईल.
२२ पासून व्याख्यानमाला
लुईस-दी-मिनेझिस ब्रागांझा व्याख्यानमालेचे २२ रोजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल. त्यानंतर ‘रिव्हिल ऑफ ज्युडिशिएल डिसिजन्स’ यावर गटचर्चा होईल. निवृत्त न्यायाधीश ए. पी. लवंदे अध्यक्षस्थानी असतील व चर्चक म्हणून ज्येष्ठ वकील एस. डी. लोटलीकर व माजी ऍडव्होकेट जनरल जे. ई. कुरल्लो परेरा सहभागी होतील.
दि. २३ रोजी सायंकाळी ५ वा. संस्कृत आणि भारतीय भाषा या विषयावर राज्य वस्तू संग्रहालयाचे निवृत्त संचालक व संस्कृतचे व्यासंगी लक्ष्मण पित्रे यांचे व्याख्यान होईल. ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानेश्वरीचे व्यासंगी, विद्धाव प्राचार्य गोपाळराव मयेकर अध्यक्षस्थानी असतील. दि. २४ रोजी सायंकाळी ५ वा. ब्रागांझा संस्थेच्या संस्थापकदिनी व्याख्यानमालेतील शेवटची गटचर्चा ‘पर्यटनाचा गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक स्थितीवर प्रभाव’ या विषयावर होईल. पर्यटन खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चक म्हणून कायदातज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर तिंबले व रोजरी कॉलेज, नुवेचे उपप्राचार्य डॉ. साविओ फालेरो हे सहभागी होणार आहेत.
काल बुधवारी पत्रकार परिषदेत ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष संजय हरमलकर व सदस्य सचिव गोरख मांद्रेकर यांनी पुस्तक सप्ताह, व्याख्यानमाला तसेच याविषयी माहिती दिली. श्री. हरमलकर म्हणाले की, विविध भाषेतील विविध विषयांवरची पुस्तके वीस स्टॉल्सवर उपस्थित असतील. त्यात गोव्याबाहेरील महत्वाचे स्टॉल्स असतील.
श्री. मांद्रेकर यांनी सांगितले की पुस्तकांच्या स्टॉल्सवर मराठी, हिंदी, कोकणी, इंग्रजीबरोबरच इतर देशी भाषांतीलही पुस्तके उपलब्ध असतील.