क्राईम डायरी

0
96

फोंड्यातील त्या चोरीत १४ लाखांचा ऐवज लंपास
मंगळवारी दिवसा ढवळ्या फोंड्यात फोडलेल्या ४ फ्लॅट्‌समधून एकूण १४ लाख रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यात दागिने व रोख रकमेचा समावेश आहे. वारखंडे येथील वृंदावन गार्डनजवळील राहुल खराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २ लाख ३३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले. याठिकाणी रामकृष्ण कुद्रे यांचा फ्लॅट फोडून ३ हजार रुपये रोख पळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सांताक्रुज फोंडा येथे एना डिमेलो यांच्या फ्लॅटमधून सहा लाख ३७ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेले. तर याचठिकाणी प्रदीप मथा यांच्या फ्लॅटमधून ५ लाख २४ हजार रुपयांच्या रोख रकमेसह काही ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फोंड्याचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज गावस पांडुरंग गावडे यांनी पंचनामा व तपास केला. पण चोरटे सापडले नाहीत. यामागे एखादी टोळी कार्यरत असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
विठ्ठलापूर साखळीत  मंगळसूत्र पळविले
विठ्ठलापूर-साखळी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास वनिता संतोष च्यारी या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली. सदर मंगळसूत्राची किंमत सुमारे १ लाख रुपये असून डिचोली पोलिसांनी याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
दुचाकीने ठोकरल्याने कुडचड्यात महिला ठार
कुडचडे येथे काल बुधवारी रात्री ९ च्या सुमारास दुचीकीने (जीए ०९ एफ ८७३३) रस्त्याच्या बाजूने चालत असलेल्या रुक्मिणी रामा नाईक (६४) या महिलेला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराने अपघातानंतर तेथून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. रुक्मिणी ह्या आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला. घरी जाण्यापूर्वी सुमारे ५०० मीटर अंतरावर असताना त्या रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. कडुचडे पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह हॉस्पिसियो इस्पितळात पाठवला आहे.
हेवाळे येथे मारहाणीची तक्रार
हेवाळे-खराडी याठिकाणी राजाराम देसाई यांनी रावसाहेब देसाई यांच्यावर लाकडाने हाता-पायावर व डोक्यावर मारहाण करत जखमी केल्याने रावसाहेब यांना उपचारासाठी बांबोळी या ठिकाणी पाठवण्यात आले. श्री. देसाई यांनी या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी राजाराम देसाई यांच्याविरुद्ध दोडामार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस आर. डी. कदम यांनी दिली.
ही मारहाणीची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. श्री. देसाई यांनी दिलेल्या महितीनुसार दोडामार्ग पोलीस स्थानकात संशयित राजाराम देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कोनाळकट्टा दूरक्षेत्राचे पोलीस श्री. कदम करत आहेत.