२१ मंत्र्यांचा शपथविधी; खातेवाटप जाहीर; शिवसेनेने मंत्रीपद नाकारले
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह चार कॅबिनेट मंत्री मिळून २१ जणांचा मंत्रीपदी काल शपथविधी झाला. यात चार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व १४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. दरम्यान, शिवसेनेच्या एका खासदाराचा शपथविधी होणार होता मात्र त्याने शपथ घेणे टाळले. केंद्रीय मंत्रिमंडळ आता ६६ सदस्यांचे बनले आहे.माजी शिवसेना खासदार व कालच भाजपात प्रवेश केलेले सुरेश प्रभू, ज्येष्ठ भाजप नेते जे.पी.नड्डा, हरयाणातील जाट नेते वीरेंद्र सिंग हे पर्रीकर वगळता अन्य तीन कॅबिनेट मंत्री आहेत.
स्वतंत्र कार्यभाराचे राज्यमंत्री केलेल्यांत, वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या बंडारू दत्तात्रय, राजीव प्रताप रुढी व दिल्लीनजीकच्या गौतम बुद्ध नगर मतदारसंघाचे खासदार महेश शर्मा, यांचा समावेश होता.
महाराष्ट्रात सत्तावाटपाचे गणित अजून सुटले नसल्याने शिवसेनेने मंत्री होण्यासाठी निवड झालेल्या अनिल देसाई या आपल्या खासदारास मुंबईत बोलावून घेतले.
दरम्यान, १४ राज्यमंत्री बनवले आहे त्यात – मुक्तार अब्बास नक्वी, राम कृपाल यादव, हरीभाई पार्थीभाई चौधरी, सनवर लाल जाट, मोहभाई कल्याणजीभाई कुंदरीया गिरीराज सिंग, हंसराज अईर, राम शंकर कथेरिया, जयंत सिन्हा, राज्यवर्धन सिंग राठोड, बाबूल सुप्रियो, साधवी निरंजन ज्योती आणि विजय सांपला (या भाजप खासदारांचा) तसेच रालोआ घटक पक्ष वाय. एस. चौधरी या तेलगू देसम पक्षाच्या खासदाराचा सरमावेश होता.
दरम्यान, कालच्या विस्तारानंतर मोदी मंत्रिमंडळ आता ६६ सदस्यांचे बनले आहे. यापैकी पंतप्रधानांसह २७ जण कॅबिनेट मंत्री, १३ स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री व २६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
काल राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, राज्यसभा उपाध्यक्ष पी. जे. कुरीयन, ज्येेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मनोहरलाल खट्टर, रमण सिंग तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्यांचा समावेश होता. कॉंग्रेसमधून कोणीही कालच्या समारंभास उपस्थित राहिला नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी काल नव्या मंत्र्यांना मोदी यांनी आपल्या रेस कोर्स निवासस्थानी चहापान आयोजित केले होते. दरम्यान, आयआयटी पदवीधर असलेले ५८ वर्षीय पर्रीकर हे मोदींचे निकटवर्ती समजले जातात. संघटनात्मक कौशल्य व सचोटीसाठी त्यांची ख्याती आहे.
सुरेश प्रभू हे शिवसेना खासदार म्हणून सर्वप्रथम वाजपेयी मंत्रिमंडळात मंत्री बनले होते. सुधारणावादी व किचकट तांत्रिक विषय कौशल्याने हाताळणारे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. दत्तात्रय यांच्या रुपाने नव्या तेलंगण राज्यास प्रतिनिधित्त्व देण्यात आले आहे. रुढी यांना पुन्हा सरकारमध्ये घेण्यात आले आहे. पहिल्यांदाच निवडून आलेले महेश शर्मा यांना स्वतंत्र कार्यभाराचे राज्यमंत्री बनवणे व माजी मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांना फक्त राज्यमंत्री करणे सर्वांच्या आर्श्चयाचा विषय होता.
दरम्यान, राज्यमंत्री बनलेले अन्य सर्वजण पहिल्यांदाच निवडून आलेले आहे. रामकृपाल यादव हे मात्र यापूर्वी लालूंच्या राष्ट्रीय जनता दलामार्फत लोकसभा व राज्यसभेवर गेलेले आहेत.