विशेष संपादकीय – तळागाळातला नेता

0
93

गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अखेर निवड झाली आणि पर्रीकरांनंतर कोण या प्रश्नावरून राज्यात निर्माण झालेले वादळ शमले. पर्रीकरांना जेव्हा केंद्रात मंत्रिपदाचे निमंत्रण आकस्मिकरीत्या आले, तेव्हा राज्यात निर्माण झालेली पोकळी भरून कोण काढणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच मुशीत तयार झालेला सक्षम नेता मुख्यमंत्रिपदावर असायला हवा याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व ठाम होते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारा ज्येष्ठ पक्षनेता म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर आणि राजेंद्र आर्लेकर ही दोन नावे पुढे आली. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा त्यावेळी विदेशात होते आणि काही झाले तरी ते पक्षात बाहेरून आलेले नेते असल्याने त्यांचे नाव थेट मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जाणे शक्य नव्हते. मात्र, फ्रान्सिस यांना हा आपला अपमान वाटला आणि गोव्यात उतरताक्षणी त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर आपण या सरकारमध्ये कोणीच नसेन एवढे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांनी बाहेर काढलेल्या अल्पसंख्यक कार्डाला काही अन्य आमदारांची साथ मिळाली, मात्र पक्षनेतृत्व ‘पार्सेकर किंवा आर्लेकर’ यावर ठाम राहिले. आर्लेकर यांचे व्यक्तिमत्त्व सौम्य व शालीन असल्याने त्यांच्या नावाला स्वीकारार्हता अधिक होती, परंतु लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा प्रशासनाचा दांडगा अनुभव, सरकारमधील ज्येष्ठता, बहुजन समाजाचे ते करीत असलेले प्रतिनिधित्व आदी गोष्टींमुळे पार्सेकर यांचे पारडे झुकले आणि आर्लेकरांचे नाव मागे पडले. आर्लेकर हे संघसंस्कारांत वाढले असल्यामुळे पक्षाचा निर्णय शिरोधार्य मानून ते शांत बसले. यातून त्यांची प्रतिमा अधिक उजळली आहे. फ्रान्सिस डिसोझा मात्र स्वतःचे घोडे दामटण्याचा केविलवाणा प्रयत्न शेवटच्या घडीपर्यंत करीत असल्याचे दिसत होते. पर्रीकरांनी व पक्षाच्या निरीक्षकांनी जेव्हा प्रत्येक आमदाराची स्वतंत्र गाठभेट घेण्यास सुरूवात केली, तेव्हा आपल्या बाजूने बोलणारे आमदार आपली बाजू लावून धरतील अशी भाबडी आशा त्यांना वाटत असावी. मात्र, पक्षनेतृत्वाने आपण घेतलेला निर्णय स्वीकारण्यास या आमदारांना भाग पाडले आणि फ्रान्सिस यांना मुकाट आपली उमेदवारी मागे घेण्यावाचून पर्याय उरला नाही. ओशाळवाणेपणाने त्यांनी आपली भीमगर्जना बासनात गुंडाळून उपमुख्यमंत्रिपदही स्वीकारले. जे आमदार फ्रान्सिस डिसोझांच्या पाठीशी बळ उभे करू पाहात होते, त्यांना पार्सेकरांचा पत्ता काटायचा होता, कारण पार्सेकर हा केवळ पक्षाचा नव्हे, तर संघाचा उमेदवार आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे अल्पसंख्यकत्वाचे कार्ड पुढे करून फ्रान्सिस यांचे घोडे पुढे दामटण्याचा जोराचा प्रयत्न झाला, मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही. साहजिकच फ्रान्सिस यांना आपले बंड मुकाट शमवणे भाग पडले. आता मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या पार्सेकर यांची खरी कसोटी लागणार आहे. पहिली बाब म्हणजे त्यांना आपली प्रतिमा सुधारावी लागेल. काही केल्या पार्सेकर हे पर्रीकर होऊ शकणार नाहीत आणि त्यांचा तसे होण्याचा प्रयत्नही नसेल. त्यामुळे आपल्या स्वतःच्या मर्यादांचे भान ठेवून त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा प्रशासनावर आणि जनमानसावर उमटवावा लागेल. प्रत्येक गोष्टीत पर्रीकरांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य असेल, परंतु त्या न्यूनगंडात न अडकता स्वतःची धडाडी दाखवत स्वतःच्या कल्पना त्यांना प्रत्यक्षात उतरवाव्या लागतील. पर्रीकरांचा आपल्या मंत्रिमंडळावर जो वचक होता, तो निर्माण करणे पार्सेकरांना सोपे नसेल. इतरांची मने न दुखावता गोव्याच्या जनतेपुढील विविध प्रश्नांना त्यांना स्वतःच्या प्रज्ञेने सामोरे जावे लागेल. राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. खाणींपासून प्रादेशिक आराखड्यापर्यंत आणि मोपापासून विशेष दर्जापर्यंतचे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. पर्रीकरांच्या यशापयशाचे ओझेही आता पार्सेकरांना वाहावे लागणार आहे. त्यांनी करून दाखवलेल्या कामांपेक्षा अधिक चांगले काम करून स्वतःचा ठसा उमटवावा लागणार आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर हा तळागाळामध्ये पाळेमुळे रुजलेला नेता आहे. त्याच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देऊया!