मायकल लोबोंची स्पष्टोक्ती; विष्णू, काब्रालही सहमत
कळंगुटचे भाजपचे आमदार म्हणजे मुलुखमैदान तोफ. राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणतेही लॉबिंग नसल्याचा निर्वाळा मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर देत असतानाच लोबो यांनी फ्रान्सिस डिसोझा यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपबाबत देशात एक चांगला संदेश जाईल असे स्पष्ट भाष्य केले.काल सकाळी या विषयावर सुरुवातीस भूमिका स्पष्ट न केलेल्या सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी उशिरा भूमिका उघड केली. ती डिसोझा यांच्या बाजूनेच. त्याआधी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही आपण डिसोझा यांच्या बाजूनेच असल्याचे संकेत देणारे भाष्य केले होते.
मायकल लोबो यांनी सांगितले की, आज देशभरात भाजपची ताकद वाढत आहे. तरीही आधीपासून व आताही विरोधी कॉंग्रेसकडून भाजप अल्पसंख्याक विरोधी असल्याचा प्रचार केला जातो. त्यामुळे हा प्रचार खोटा ठरविण्याची संधी गोव्यात निर्माण झाली आहे. गोव्यातील भाजपने डिसोझांना मुख्यमंत्री करून उदाहरण घालून द्यावे अशी प्रतिक्रिया लोबो यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्रीपदावरून डिसोझांना मुख्यमंत्रीपदी बढती द्यावी असा त्यांचा सूर होता.
डिसोझांना बढती द्यावी : वाघ
फ्रान्सिस डिसोझा हे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना बढती द्यावी. अनेक वेळचे आमदार मंत्री म्हणून त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. मंत्रिमंडळातील ते अल्पसंख्यकांचा चेहरा आहेत. हिंदू असूनही आपण डिसोझा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगतो असे वक्तव्य वाघ यांनी केले.
डिसोझा मुख्यमंत्री बनले तर आनंदच : टिकलो
विद्यमान उपमुख्यमंत्री डिसोझा मुख्यमंत्री बनले तर आपल्याला आनंदच आहे, असे उद्गार आमदार ग्लेन टिकलो यांनी काढले. मात्र पक्षाने योग्य तो निर्णय घ्यायचा आहे असेही ते म्हणाले. नीलेश काब्राल यांचाही असाच सूर होता.
भाजपच्या निवडीला मगोचा पाठिंबा : ढवळीकर
दरम्यान, भाजप नवा मुख्यमंत्री म्हणून ज्याची निवड करतील त्याला मगोचा पाठिंबा असेल असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. तर गोविपाचे अध्यक्ष मिकी पाशेको यांनी आपल्याला कोणीही चालेल असे वक्तव्य केले.