पर्रीकरांसह दहा नवे चेहरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी करण्याची शक्यता येथील राजकीय वर्तुळात असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह किमान सहा नव्या चेहर्यांचा त्यात समावेश असेल असे सूत्रांचे मत आहे. गेल्या बर्याच काळापासून केंद्रात जाण्याबाबत आढेवेढे घेणारे पर्रीकर यांनी पंतप्रधान मोदी यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारल्याने त्यांच्या संदर्भातील तर्कवितर्कांनाही पूर्णविराम मिळाला आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या स्वरुपाविषयी अद्याप अधिकृतपणे काहीही स्पष्ट केले जात नसले तरी भाजपमधील प्रभावी मुस्लिम नेते मुख्तार अब्बास नकवी, भाजप युवा विभाग अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचाही पर्रीकर यांच्याप्रमाणेच नव्या चेहर्यांमध्ये समावेश असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, भाजपचे मित्र पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनीही मंत्रिमंडळ विस्तार लवकर होण्याचे संकेत दिले. या अनुषंगाने येत्या दोन दिवसात सारे काही स्पष्ट होईल असे नायडू यांनी पत्रकारांना सांगितले.
सध्या मोदी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या २२ असून तेवढेच राज्यमंत्रीही त्यात आहेत. त्यापैकी १० मंत्र्यांकडे स्वतंत्र ताबा आहे. त्यांच्यापैकी नितिन गडकरी, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन व पियुष गोयल यांच्याकडे एकाहून अधिक खाती आहेत. येत्या रविवार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास केंद्रात सत्ता संपादन केल्यानंतर त्यांचा हा पहिला विस्तार ठरेल. मोदी ११ नोव्हेंबरपासून तीन देशांच्या दौर्यावर निघणार आहेत. येत्या २४ पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून त्याआधी ते मायदेशी परतणार आहेत. दरम्यान, एनडीए सरकार शिवसेनेचे नेते सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात घेण्यास उत्सुक असले तरी शिवसेनेतर्फे त्याला खोडा घालण्याचा डावपेच असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभू यांच्याऐवजी शिवसेनेतर्फे अनिल देसाई यांचे नाव पुढे करण्याचे घाटत असल्याचे सांगण्यात आले.