केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

0
120

केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर असलेला अतिरिक्त बोजा व काही अन्य कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मंत्रिमंडळात महत्त्वाचे फेरबदल करणार असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण व वित्त ही खाती सर्वात महत्त्वाची मानली जातात व ती दोन्ही खाती अरुण जेटली यांच्याकडे आहेत. ही अत्यंत महत्त्वाची खाती एका मंत्र्याला सांभाळणे ही मोठी कठीण बाब असल्याचे मानले जाते. रवी शंकर प्रसाद (माहिती तंत्रज्ञान आणि कायदा) व प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारण आणि पर्यावरण) हेही प्रत्येकी दोन खाती सांभाळत आहेत. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात तडफदार व झपाट्याने काम करणार्‍या मंत्र्यांच्या शोधात असल्याची चर्चा आहे. अशा मंत्र्यांच्या उणीवेमुळे अपेक्षित कामगिरी साधणे मोदींना अडचणीचे ठरत असल्याची भावनाही आहे.
या पार्श्‍वभूमीवर मोदी मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास सुषमा स्वराज. (विदेश व्यवहार) व राजनाथ सिंग (गृह) यांचा अपवाद सोडल्यास या मंत्रिमंडळात दिग्गज मंत्री दिसत नाही. त्यातच सुषमा स्वराज यांचा राजकीय दबदबा यथातथाच मानला जातो. त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की, मंत्रिमंडळ पातळीवर पंतप्रधान मोदी व अरुण जेटली हे प्रशासनात तर भाजप संघटनात्मक पातळीवर अध्यक्ष अमित शहा यांचाच मोदी सरकारवर वरचष्मा असल्याचे मानले जाते. या परिस्थितीची अलीकडेच प्रकर्षाने जाणीवही झाली होती. अरुण जेटली आजारी पडले असता संरक्षण व अर्थ या दोन्ही खात्यांमध्ये पोकळी दिसून आली होती. तसेच त्यांच्यावर कामाचा प्रचंड बोजा असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजपात प्रभावीपणे केंद्रीय मंत्रिमंडळात काम करणार्‍यांची वानवा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
स्मृती ईराणी (मनुष्यबळ विकास), प्रकाश जावडेकर व थेवरचंद गेहलोत (सामाजिक न्याय) यांच्या कामगिरीविषयीही तर्कवितर्क सुरू झाले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे. परिणाम स्वरूप पंतप्रधान मोदी जेटली व अमित शहा यांच्याशी सल्लामसलत करून आपल्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे बदल घडवणार असल्याची चर्चा आहे.