क्षमता व बुद्धीचा वापर सहकार क्षेत्रात आवश्यक : मुख्यमंत्री पर्रीकर

0
126
सहकार भारतीच्या महाअधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत अन्य मान्यवर. (छाया : शेखर वायंगणकर)

सहकार भारतीच्या महाअधिवेशनाचे पर्वरीत उद्घाटन
काम करण्याची क्षमता आणि बुद्धीचा वापर हे गुण सहकार क्षेत्रात काम करणार्‍यांच्या अंगी असणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. काल येथील विद्याप्रबोधिनी संकुलात सहकार भारती आयोजित पतसंस्थांच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार क्षेत्राला उत्तम कार्यकर्त्यांची गरज असते. उत्तम कार्य केल्यानेच सहकार क्षेत्र प्रगती करू शकेल. समर्पणाची भावना सहकार क्षेत्रात काम करणार्‍यांच्या अंगी असावी असे माझे प्रामाणिक मत आहे असे ते पुढे म्हणाले. स्वागताध्यक्ष खासदार नरेंद्र सावईकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहकार क्षेत्रातील खुबी सांगितल्या. सहकार क्षेत्रात उद्बोधन महत्त्वाचे असते असे ते म्हणाले. खासदार सावईकर यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण करण्यात आले. सहकार मंत्राने आणि सहकार स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री पर्रीकर आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सहकार स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री डॉ. उदय जोशी यांनी सहकार क्षेत्राचे कार्य विशद केले. व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार नरेंद्र सावईकर,आमदार सुभाष फळदेसाई, राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे,गोवा अध्यक्ष प्रकाश वेळीप,सुभाष हळर्णकर, जितुभाई व्यास,विजयजी देवांगन,सतीश भट, विनय खटावकर, प्रा सुभाष वेलिंगकर, किरण ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल पांडे यांनी केले.
शनिवार व रविवार दि २ नोव्हेंबर असे दोन दिवस
महाअधिवेशन चालणार असून अधिवेशनाला देशातील विविध राज्यांतून प्रतिनिधी आणि सहकार आस्थापनानी उपस्थिती लावली आहे.