![1Fadnavis_2181345g.jpg1](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/11/1Fadnavis_2181345g.jpg1_.jpg)
अमित शहांनी विनंती केल्याने ठाकरेंचा निर्णय
महाराष्ट्रातील पहिल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा काल भव्य सोहळ्यात शपथविधी झाला. दरम्यान, सोहळ्यास शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शेवटच्या क्षणी उपस्थिती लावली. महाराष्ट्राचे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री ४४ वर्षीय देवेंद्र यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. वानखेडे स्टेडियमवरील या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी उपस्थित होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे (राजस्थान), आनंदीबेन पटेल (गुजरात), मनोहर पर्रीकर (गोवा), रमण सिंग (छत्तिसगढ), मनोहर लाल खट्टर (हरयाणा), तसेच चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश), प्रकाश सिंग बादल (पंजाब) यांचीही उपस्थिती होती.
सोहळ्यात मोठे उद्योगपती, बॉलीवूड सितारे, तसेच फडणवीस यांच्या बँक अधिकारी असलेल्या पत्नी अमृता यांची हजेरी होती.
दरम्यान, अपमानास्पद वागणुकीमुळे शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकलेल्या शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी फोन करून विनंती केल्यामुळे शेवटच्या क्षणी उपस्थि राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सोहळ्यात सर्व नजरा मोदी व उद्धव यांच्यावर होत्या. दोघांनीही कार्यक्रमानंतर एकमेकांशी हस्तांदोलन केले. दरम्यान, २८८ जणांच्या विधानसभेत भाजपकडे १२१ जागा आहेत. राज्यपालांनी त्यांना दोन आठवड्यात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. दरम्यान, अल्पमतातील या सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ४१ आमदारांनी बिनशर्त बाहेरून पाठिंबा देण्याचे आधीच जाहीर केले आहे.
१० जणांचे मंत्रिमंडळ
देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० जणांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली यात आठ कॅबिनेट तर दोन राज्यमंत्री आहेत. ते असे – एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुंगटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, आदिवासी नेते विष्णू सावरा, चंद्रकांत पाटील.(कॅबिनेट).
दिलीप कांबळे, विद्या ठाकूर (राज्यमंत्री).