कल्पनाः एक चिव चिव चिमणी….!

0
279

– प्रा. भानुदास खैरकर, पर्वरी
सहज सुचलं म्हणून, रखडले चार शब्द|
कळत, नकळत आशय, होत गेला निःशब्द॥
या विश्‍वाच्या पसार्‍यात वावरणारा माणूस खरोखरच एक अजब रसायन आहे! अन् त्याच्या मनःकोषात डोकावून जाणारी कल्पना ही तर त्याच्याहूनही अधिक अजब गजब आणि विचित्र रसायन आहे, असे म्हणता येईल! ती प्रत्यक्षात दिसली – गवसली असे वाटत असतानाच भुर्रदिशी निघून जाण्यात तिला काही वेगळीच मौज-मजा वाटत असते बघा! फसवण्यात-चकवण्यात ती नामी शक्ती ठरावी. याच तिचा कोणी हात धरेल, तर शपथ!अर्थात कल्पना ही मानवी मनाची एक वृत्ती-प्रवृत्ती आहे, म्हणूनच तिला मनोवृत्ती म्हणत असावेत! तिचे समोर होणारे आगमन म्हणजे चिमणीसारखेच नाही काय? इवलासा हा जीव बरे, ती आपल्या समोरच्या खिडकीत येते काय, क्षणभर तेथे विसावते काय, नि इकडे तिकडे बघत क्षणाक्षणाला मान मुरकन समोरच्या माणसांच्या मनाचा थांगपत्ता घेते काय! आणि हळूच नकळत चिवचिव करीत भुर्रदिशी पलायन करते काय! सारेच कसे अनपेक्षित नि अतर्क्य!
अगदी तसेच या आपल्या कल्पनाराणीचे म्हणता येईल, नाही काय? तुमचे किंवा इतर कुणाचे मन काहीही असू दे, पण माझे तर मन असे झालेय बघा. चिमणी निदान आपल्या डोळ्यांना साक्षात दिसते तरी, कारण ती एक भौतिक व पार्थिव वस्तू- प्राणी आहे. परंतु कल्पनाराणी, ती तर पूर्णतः अमूर्त, भावनात्मक आपल्या पंचज्ञानेंद्रियांना मुळीच गम्य होत नाही, तर साकार कशी होणार?
मानवी मन अगम्य व अतर्क्य, तसेच मनाच्या या पिंजर्‍यात वावरणार्‍या कल्पना चिमणीचे आहे. बरे तिचे अस्तित्व केवळ भास, आभास नि मनोमय! नुसते मनोचिंतन! भासमान जीवनजाणीव! मानवी मनाची निव्वळ फसवी अवस्था, केवळ जाणवणारी स्थिती गती. तिचे अचूक स्वरुप, सामर्थ्य नाही कुणाला सांगता यायचे. अगदी उच्च कोटींच्या मनोवैज्ञानिकाला देखील आकलन न होणारे. तिचे अस्तित्व स्वरुपच मुळात अगम्य, अनाकलनीय. तसेच तिचे बलसामर्थ्यही न समजणारे, जाणवण्याच्या पलीकडचे. एखाद्याच्या मनोविश्वात ती कधी संचार करेल आणि कधी कशी त्या कोषातून निघून जाईल हे काहीही सांगता यायचे नाही बरे! साराच मामला फसवाफसवीचा, गडबड गोंधळाचा! कोणी जग जिंकणारा अजिंक्यवीर योद्धा असो, पण प्रत्यक्षात त्यालाही हारच मानावी लागेल तिच्या बाबतीत. नाही काय?
तिची नाममुद्रा सुद्धा काहीशी फसवी म्हणतात? म्हटले तर ती कल्पना म्हणजे मनःकोशात वावरणारी ही शक्ती, एक विचारव्यूह, हवे तर तिला भावना ही संज्ञा खचित देता येऊ शकेल. अर्थात विचार नि कल्पना यात शास्त्रीय विचारवेत्ते, हवा तेवढा फरक करतात म्हणे! करोत बिचारे. पण ही कल्पना मनाच्या पिंजर्‍यात कशी येईल, कधी येईल, किती वेळ येईल, त्या दरम्यान ती कोणता नि कसा चमत्कार घडवून जाईल? हे काहीही सांगता येणार नाही. तसेच ती मनात डोकावून गेलीच तर ती कधी व केव्हा गमन करेल, याचा कुणालाही काही पत्ता लागायचा नाही.
म्हणूनच विज्ञानक्षेत्रातले प्रयोगशील शास्त्रज्ञ, संशोधक, गहन तत्त्वांचे चर्वितचर्वण करण्यात रममाण झाले. कवी लेखक, नाटककार नि प्रतिभावंत कलावंत, चित्रकार, गायक अभिनेते सारेच या कल्पनाशक्तीपुढे हात टेकूनच असतात. ते काही उगाच नव्हे! कित्येक कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक यांच्या कला व साहित्यकृती, मूर्ती-शिल्प कधी पूर्णत्वाला गेल्या, तर कधी अर्धवट, अपूर्णच राहिल्या.
लाखमोलाचे प्रयत्न करता, आर्जव धरूनही प्राप्ती या कल्पना माऊलीची सारखी मनधरणी करूनही ती पुन्हा प्रसन्न झाली असे सहसा जाणवत नाही. तिचा रुबाब, रुसवा नि तोरा काही न्याराच असतो बघा. म्हणूनच आधुनिक मराठी काव्याचे कविकुलगुरू केशवसुत या प्रतिभावंताने तिला ‘रुष्ट सुंदरी’ म्हणून संबोधून पुढे पददोपदी तिची विनवणी केली. तिचे जाणवणारे स्वरुपसामर्थ्य सांगताना ‘क्षणात नाहिसे होणारे दिव्य भास’ आपल्याला नीट शब्दबद्ध करता येत नाही अशी खंत मोठ्या पोटतिडकीने बोलून दाखवली. तसेच कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या मते, कल्पनाशक्ती ही तर अख्या विश्‍वाची राणी आहे, ती दंग होऊन कोणती गाणी गाईल, ते काही सांगता यायचे नाही. ती आपल्या नादात राहते, वावरते, तिच्या मनात आले तर मातीचे सुवर्ण-सोने होईल, अत्यंत सामान्य कुवतीचा माणूस तिच्या कृपाप्रसादाने थोर, महान म्हणजे प्रतिभावंत गणला जाईल! आणि ती जर रुसली, नाराज-निराश झाली, तर मौल्यवान सोन्याची मृण्मय-माती होईल! एकूण या कल्पनाशक्तीचा तोराच न्यारा, हेच खरे नाही काय?