फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

0
103

नेतेपदी निवड : ३१ रोजी शपथविधी
महाराष्ट्र भाजप आमदारांच्या काल झालेल्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या भाजप सरकारचे फडणवीस मुख्यमंत्री असतील. शुक्रवार दि. ३१ रोजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधीचा कार्यक्रम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३० हजार पाहुण्यांची हजेरी असेल.दरम्यान, काल झालेल्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा ठराव गत विधानसभेचे विरोधी नेते एकनाथ खडसे यांनी मांडला. त्याला विधान परिषदेचे विरोधी नेते विनोद तावडे व कोअर समिती सदस्य सुधीर मुंगटीवार व पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजप सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी जे. पी. नड्डा उपस्थित होते. बैठकीनंतर काल संध्याकाळी फडणवीस यांनी इतर भाजप नेत्यांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राज भवनावर भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. मराठा समाजाचे नेते व ‘मराठा’ राजकारणाचे प्राबल्य असलेल्या महाराष्ट्राचे फडणवीस हे शिवसेनेच्या मनोहर जोशींनंतर दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री असतील. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीस काम करत असताना पक्षाला राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी मोठे यश प्राप्त झाले होते. मोदी यांनी एका रॅलीत फडणवीस यांची ओळख ‘नागपूरची देशाला भेट’ अशी करून दिली होती. २८८ सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. २००९ साली भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या.
परिचय – नितीन गडकरी आपले गुरू मानतात त्या सुरुवातीला जनसंघाचे व नंतर भाजपने नेते कै. गंगाधर फडणवीस यांचे सुपूत्र देवेंद्र यांचा जन्म २० जुलै १९७० साली नागपूर येथे झाला. संघाच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्र यांनी १९८९ साली संघाचा विभाग असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. २२व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे नगरसेवक बनले तर १९९७ साली २७व्या वर्षी त्यांनी महापौरपद  भूषविले.  स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्तेे देवेंद्र यांनी १९९९ साली पहिली विधानसभा निवडणूक जिंकली त्यानंतर सलग तीन विधानसभा निवडणुका ते जिंकले. सध्या ते नागपुरच्या दक्षिण पश्‍चिम मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. कायद्याची पदवी व व्यवस्थापनशास्त्रात पदव्यूत्तर पदवी असलेल्या फडणवीस यांनी अर्थशास्त्रासंबंधी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. मितभाषी, विनम्र, मनमिळावू राजकारणी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कारही त्यांना लाभला होता.