अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निलोफर’ वादळाचे महाचक्रीवादळात रूपांतर झाले असून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत गुजराथच्या कच्छ जिल्ह्यात पोचण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले. त्यानंतर ते पाकिस्तानपर्यंत जाईल. दरम्यान, वादळामुळे सौराष्ट्र व कच्छ जिल्ह्यांच्या किनारी भागांत मुसळधार पाऊस व वादळी वारे वाहतील. वादळाचा सामना करण्याच्यादृष्टीने गुजरात प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सध्या हे वादळ अरबी समुद्रात कच्छमधील नलिया गावापासून ११७० कि.मी. व ओमनपासून ८८० कि.मी. अंतरावर आहे. आंध्र प्रदेशची वाताहात केलेल्या ‘हुडहुड’ वादळानंतर हे अवघ्या दिवसांतील दुसरे महाचक्रीवादळ आहे.दक्षिणेत चार तालुक्यांच्या सुरक्षेचा आढावा
वादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षिण गोव्यातील सासष्टी, सांगे, केपे, काणकोण या तालुक्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. काल दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोदर मोरजकर यांनी या तालुक्यांतील उपजिल्हाधिकारी व मामलेदारांची बैठक घेऊन आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. सखल भागांत पाणी भरण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा ठिकाणी फिरती पथके तैनात करण्यात येणार आहेत.
केपे येथे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी सांगे, केपे, काणकोण तालुक्यांचे मामलेदार यांच्यासह आपत्कालीन यंत्रणेची बैठक घेतली. यावेळी पोलीस, वाहतूक खाते, वीज खाते, अग्नीशामक दल यांचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत चर्चा करून संबंधित अधिकार्यांना सूचना करण्यात आल्या. पूरसदृश्य स्थिती उद्भवल्यास यंत्रणा तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले.
गोव्यात चक्रीवादळाचा धोका टळला : वेधशाळा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेथे तयार झालेले चक्रीवादळ गोव्यात धडकण्याची जी भीती निर्माण झाली होती ती आता नाहीशी झाल्याचे येथील वेधशाळेच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी काल सांगितले.
‘निलोफर’ असे नामकरण करण्यात आलेले हे चक्रीवादळ रविवारी पश्चिम मध्य अरबी समुद्र तसेच समुद्रात नैऋतेच्या दिशेने होते. सोमवारी ते अरबी समुद्रात पश्चिम दिशेकडे मध्यस्थानी होते. गुजरातच्या नलिया येथून ते ११७० कि. मी. एवढ्या अंतरावर सध्या आहे.
येत्या २४ तासात या वादळाची तीव्रता वाढणार असली तरी गोव्याला त्याचा धोका नसल्याचे मिनी यांनी स्पष्ट केले. ईशान्येकडे वाहणार्या वार्याचा वेग वाढल्यास हे वादळ गोवा, मुंबई व गुजरात येथे धडकण्याचा धोका होता. मात्र, तो आता टळला आहे. आता हे वादळ वायव्येच्या दिशेने पुढे सरकू लागले आहे. रविवारचा संपूर्ण दिवस ते पुढे सरकले नव्हते. मात्र, कालपासून ते वायव्येच्या दिशेने १०० कि. मी. पुढे सरकले आहे. परिणामी गोव्याला वादळाची असलेली भीती दूर झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवस राज्यात मध्यम अथवा जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
उत्तर जिल्ह्यासाठीही नियंत्रण कक्षाची स्थापना
गोव्याच्या किनारपट्टीपासून पश्चिम मध्य अरबी समुद्रातील ‘निलोफर’ वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून उत्तर गोव्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष २४ तास खुला राहणार आहे. वादळ समुद्रात आहे तेथून उत्तरेकडे वळेल व नंतर इशान्येकडे वळण घेऊन ३१ रोजीपर्यंत उत्तर गुजरात व पाकिस्तानपर्यंत जाईल, असे वेधशाळेचे अनुमान आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून आपत्कालीन स्थितीत नागरिकांना तेथे संपर्क साधता येईल.
नियंत्रण कक्षांचे क्रमांक असे
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.
टोल फ्री क्र. – १०७७
उत्तर गोवा
जिल्हाधिकारी कार्यालय, पणजी २२२५३८३
बार्देश मामलेदार २२६२२१०
पेडणे मामलेदार २२०१२२३
डिचोली मामलेदार २३६२२३७
सत्तरी मामलेदार २३७४०९०
फोंडा मामलेदार २३१२१२१
दक्षिण गोवा
मडगाव – २७९४१०० केपे – २६६२२२८
सांगे – २६०४२३२ काणकोण – २६४३३२९