महसूल वाढविण्यासाठी सरकार नव्या आर्थिक स्रोतांच्या शोधात

0
112

राज्याचा महसूल वाढविण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नाविन्यपूर्ण अशा नव्या स्रोतांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हे स्रोत कशा स्वरुपाचे असतील हे अद्याप जाहीर केलेले नसले तरी येत्या अर्थसंकल्पात ते दिसून येतील.राज्यातील खाण व्यवसाय दोन वर्षे बंद राहिल्याने त्याचा जीडीपीवर सुमारे दहा टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम झाला आहे. खाण बंदीमुळे खाण अवलंबितांना पॅकेज देण्याचीही सरकारला व्यवस्था करावी लागली. वरील परिस्थिती निर्माण झाली असली तरी राज्याचा विकास बंद ठेवणे सरकारला शक्य नाही, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. नवे आर्थिक स्रोत कोणते असतील हे नंतरच जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.
त्यात काही सेवांचाही अंतर्भाव असू शकेल. पेट्रोलवरील करात एक दोन रुपये वाढ करण्याचे सूतोवाच पर्रीकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. खनिज निर्यात रॉयल्टीही दहा वरून पंधरा टक्क्यांवर आणण्याची सरकारची तयारी आहे. सर्वसामान्य लोकांना झळ बसणार नाही याची काळजी घेऊनच महसूलाचे नवे स्रोत शोधून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे सांगण्यात येते.