अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निलोफर’ वादळाच्या पार्श्वभूमीवर वेधशाळेने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात व दमण दीव, लक्ष्वद्वीपला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. समुद्रात तयार झालेल्या या वादळामुळेच सध्या गोव्यात पाऊस सुरू झाला आहे.अरबी समुद्रात तयार झालेले ‘निलोफर’ वादळ गुजरात, पाकिस्तानच्या दिशेने वळू लागले आहे, त्याचा वरील राज्यांच्या किनारी भागांना फटका बसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. तीन दिवसांपूर्वी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता त्याचे आता वादळात रुपांतर झाले आहे. येत्या ७२ तासांच्या काळात हे वादळ गुजरात व पाकिस्तानपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.
हल्लीच आंध्र प्रदेश व उदिशात आलेल्या प्रलयंकारी ‘हुडहुड’ वादळात ७० हजार रु. कोटींची हानी झाली होती.
आणखी चार दिवस पावसाची शक्यता
राज्यातील संततधार पाऊस चालूच असून पुढील चार दिवस तो चालूच राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात वादळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याची सूचना केली आहे. त्यामुळे ट्रॅालर समुद्रात उतरलेच नाही. दरम्यान, आज, उद्या आकाशात ढग दाटलेले असतील व पाऊस चालू राहील असे अनुमान वेधशाळेने वर्तविले आहे. आज दि. २७ तसेच उद्या २८ रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. येत्या २४ तासांत समुद्रही खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. परवा सुरू झाल्यापासून १५० मी.मी. पाऊस पडला आहे.