अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस झाला. काल पहाटे तर राज्यातील बहुतेक भागांत मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले.आज व उद्याही राज्यातील काही भागात मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे येथील वेधशाळेच्या संचालक व्ही. के. मिनी यांनी काल सांगितले.
गेले दोन ते तीन दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. पण त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे आता पाऊस कमी होणार असल्याचे मिनी यांनी सांगितले.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतीचे व विशेष करून भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता कृषी खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली. भात कापणीचा मोसम जवळ आलेला असून पावसामुळे त्यात व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग सध्या चिंतेत आहे.
बार्देशात भातपिकाची हानी
म्हापसा (न. प्र.) ः शुक्रवारी संध्याकाळी अचानकपणे पडलेल्या अवकाळी पावसामुळे बार्देश तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे ओहोळ वाहू लागले होते ते काल शनिवार दुपारपर्यंत चालू होते. विशेषतः काल सकाळच्या धुवांधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
म्हापसा पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणीची गटारे गायब झालेली असल्याने पावसाचे पाणी गटारातून सरळ रस्त्यावरून वाहत जाते. त्यामुळे रस्ता कुठला आणि गटार कुठचे असा प्रश्न उभा राहतो. सध्या म्हापसा पालिका क्षेत्रातील बहुतेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून त्याला पाण्याच्या तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.
शुक्रवार संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने सुरुवात केल्याने सर्वांची धांदल उडाली. दुचाकी वाहन चालक व इतरांनी रेनकोट व छत्री आणली नसल्याने त्यांनी भिजत घरी जावे लागले. शुक्रवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस काल शनिवारी दुपारपर्यंत संततधार चालू होता. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचीही धांदल उडाली. बार्देश तालुक्यातील शेतकर्यांनी घेतलेले भात पीक गेल्या १५ दिवसांपूर्वी पिकले. काही शेतकर्यांनी मशीनद्वारे व हाताने भात कापले होते. त्यांचे भात कालच्या पावसामुळे भिजून गेले. त्यामुळे शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.