पर्यटन खात्याच्या दोन प्रकल्पांचा लवकरच शुभारंभ

0
91

बहुमजली पार्किंग, बोटींसाठी जेटी पूर्णत्वाकडे
पणजी येथे सांता’ोनिका जेटीजवळ उभारण्यात येत असलेल्या बहु’जली पार्किंग प्रकल्पाचे तसेच जलसफरींच्या बोटींसाठी उभारण्यात येत असलेल्या नव्या जेटीचा पुढील महिन्याअखेरपर्यंत शुभारंभ करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल सांगितले.
२६ कोटी रु. खर्चून उभारण्यात येत असलेल्या बहुमजली पार्किंग प्रकल्पाचे तसेच १७ कोटी रु. खर्चून उभारण्यात येत असलेल्या नव्या जेटीचे काम जवळ जवळ पूर्ण झालेले असून पुढील महिन्याच्या शेवटी या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
बहुमजली पार्किंग प्रकल्पामध्ये एकाच वेळी ४८० गाड्या पार्क करून ठेवता येणार असल्याने हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर शहरातील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.पर्यटकांना जलसफरींसाठी नेणार्‍या बोटींच्या सोयीसाठी नवी जेटी बांधण्यात आलेली असून या जेटीचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर सध्या जलसफरींसाठीच्या ज्या आठ बोटी आहेत त्या आठ बोटींची चांगली सोय होणार आहे. या आठ बोटींपैकी सहा बोटी या खासगी आहेत. तर दोन बोटी या गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या आहेत. दरम्यान, जलसफरीसाठीच्या बोटी सुरू करण्यासाठी आणखी पाच खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव आलेले आहेत. मात्र, आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नसल्याचे परुळेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जलसफरी करणार्‍या बोटींच्या सोयीसाठी नव्या जेटीजवळ लवकरच एक टर्मिनल उभारण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये तिकिटांची सोय, जलसफरींसाठी येणार्‍यांना प्रतीक्षा खोली (वेटिंग रूम) व अन्य सर्व आवश्यक त्या सुविधा असतील. दरम्यान, पुढील महिन्याच्या शेवटापर्यंत पर्यटन भवनमध्ये गोवा पर्यटन विकास महामंडळ, पर्यटक पोलीस, महाराष्ट्र पर्यटन केंद्र, भारतीय पर्यटन केंद्र यांच्यासह पर्यटनाशी संबंधित सर्व केंद्रे हलवण्यात येणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.