अखेर महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी सहकार्याचा हात देण्यास शिवसेना राजी झाल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटून आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाईं) पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी या संदर्भात केलेल्या व्यक्तव्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.राज्यात भाजपबरोबर सरकार स्थापनेसाठी सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे ठाकरे यांनी आपल्याला सांगितले अशी माहिती आठवले यांनी पत्रकारांना काल दिली. मात्र काही मुद्द्यांवर शिवसेनेला भाजपशी तडजोड करावी लागेल असे ते म्हणाले. या संदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेने भाजपवर जहरी टिका केली होती ही बाब खरी असली तरी आता त्या गोष्टी भूतकाळातील गोष्टी मानल्या जाव्यात असे मत त्यांनी मांडले. उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या घटकांसाठी आयोजिलेल्या मेजवानीला उपस्थित राहण्यास शिवसेनेने आपल्या आमदारांना मान्यता दिल्याचे निश्चित झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी काल ठाकरे यांची भेट घेतली.