ऍडव्होकेट जनरलच्या नावाने मुरगांव तालुक्यातील तीन पंचायतींकडून प्रत्येकी २५ हजार रुपये उकळणार्या मुरगांवच्या निलंबित गटविकास अधिकारी मोहिनी हळर्णकर यांच्याबरोबर चिखली कोमुनिदादच्या नोंद वहीतील पाने फाडून नेण्याच्या घटनेवेळी उपस्थित असलेल्या अधिकारी सरोज नाईक यांचीही वास्को पोलिसांनी कसून चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे.
गोव्याच्या ऍडव्होकेट जनरलना खटल्याचे पैसे देण्याचे खोटे कारण देऊन पंचायतींकडून पैसे उकळणे, लोकसभेच्या निवडणुकीवेळी काम केलेल्या कर्मचार्यांचे पैसे हडप करणे तसेच चिखली पंचायतीच्या कार्यालयात घुसून नोंदवहितील पाने फाडून गायब करणे असे अनेक प्रकार घडले आहेत.चिखली पंचायतीच्या कार्यालयात घुसून नोंदवहीतील पाने फाडून नेली त्यावेळी सौ. हळर्णकर सोबत गट विकास कार्यालयातील अधिकारी सरोज नाईक याही उपस्थित होत्या.
त्यासंबंधीची तक्रार पंचायत सचिव सिध्देश फळदेसाई यानी वास्को पोलिसांत केली असता वास्को पोलिसांनी तिची वेगळी चौकशी चालविली आहे.
गुरुवारी एकाच वेळी तीन पंचायत आणि मुरगांव बीडीओ कार्यालयांची झडती घेऊन पोलिसांनी कार्यालयांतील वेगवेगळे दस्ताऐवज जप्त केले आहेत. बीडीओ कार्यालयातील विविध दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून काही फाईल्स गहाळ असल्याचेे छापसत्रात आढळून आले आहे. दरम्यान, सौ. हळर्णकर यांचा पाठिंबा दर्शविण्यार्या बिडीओ कार्यालयातील अनेकांच्या पोलिसांनी जबान्या नोंदविल्या आहेत. मुख्य कारकून नाडकर्णी याचीही पोलिसांनी चौकशी पोलिसांनी केली. चिखली पंचायतीतील दस्तावेज पळविण्यात आले तेव्हा सौ. हळर्णकर सोबत अधिकारी सरोज नाईक उपस्थित होत्या.