जवानांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी ७४५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करून पूरग्रस्तांना दिवाळी भेट दिली. मोदी पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तेथे गेले आहेत. काल त्यांनी सियाचीन क्षेत्रातील भारतीय जवानांसमवेत दिवाळी साजरी केली.
मोदी यांनी केलेल्या पॅकेजच्या घोषणेनुसार १७५ कोटी रुपये इस्पितळ उभारणीसाठी असून घरे बांधण्यासाठी ५७० कोटी रुपयांची मदत जम्मू-काश्मीर राज्याला दिली जाणार आहे. या राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके उपलब्ध करणार असल्याचे मोदी यांनी काल जाहीर केले.मोदी यांनी त्याआधी या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचीही भेट घेतली. दरम्यान विरोधी कॉंग्रेसने पंतप्रधानांचा हा दौरा म्हणजे राजकीय प्रसिध्दी स्टंट असल्याची टिका केली आहे.
सियाचीनमध्ये जवानांची भेट घेत असताना मोदी यांनी तेथे काम करणार्या जवानांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. काही वेळ त्यांच्यासोबत त्यांनी घालवला. श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांचे शिष्टमंडळ ही पंतप्रधानांना भेटणार आहेत.
श्रीनगरला दाखल होण्याआधी मोदी यांनी सकाळी सियाचीनला भेट दिली. तेथे त्यांनी सुमारे तासभर जवानांबरोबर घालवला. तेथूनच त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जवानांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आधी घोषणा न करताच सियाचीनला आल्याचे त्यांनी यावेळी जवानांना सांगितले.
त्याआधी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की राज्यातर्फे करण्यात आलेली ४४ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी केंद्र सरकार मान्य करणार अशी आशा आपल्याला आहे. तर मोदी यांनी या संदर्भातील सर्व बाबींची पडताळणी केली जात असल्याचे विमानतळावर पत्रकारांना सांगितले.