राज्यात दिवाळीचे उत्साही स्वागत

0
109

वर्षपद्धतीप्रमाणे पहाटे ठिकठिकाणी नरकासूर प्रतिमांचे दहन करून गोमंतकियांनी दिवाळी सणाचे उत्साहाने स्वागत केले.घराघरात पणत्या, मेणबत्या तसेच विजेची रोषणाई केल्याने सर्वत्र प्रकाश पसरविण्याचा संदेश देण्यात आला. गणेश चतुर्थीनंतर दिवाळी हा गोमंतकियांचा महत्त्वाचा सण. काल रात्री अनेक संस्थांनी दिवाळीच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नरकासूर प्रतिमा, आकाश कंदिलाच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. पणजीसह राज्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये गेले चार दिवस आकाशकंदील, पणत्या तसेच नरकासूराचे रंगीबेरंगी मुखवटे अशा वस्तूंची दालने उघडण्यात आली होती. वरील वस्तूंच्या खरेदीसाठी काल पणजीसह सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. हिंदू धर्मियांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने कपडे खरेदी करण्याची प्रथा आहे. काल संध्याकाळी उशिरापर्यंत कपड्यांच्याही दुकानांत गर्दी होती. दिवाळी हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक कुटुंबे आपल्या गावी जाण्यास निघाली होती. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीचीही कोंडी झाल्याचे दिसून आले. पोह्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते एकमेकांना देणे हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. उद्या गुरुवारी लक्ष्मी पूजन, शुक्रवारी पाडवा, शनिवारी भाऊबीज असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.