हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काल प्रथमच आमदारपदी निवडून आलेल्या मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची घोषणा केली.त्याआधी हरयाणा भाजप विधीमंडळ गटाच्या बैठकीत खट्टर यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. खट्टर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व भाजप प्रदेशाध्यक्ष अशा जबाबदार्या सांभाळल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे ते मर्जीतील मानले जातात. पक्षनिष्ठ व स्वच्छ प्रतिमा या जमेच्या बाजू असलेले खट्टर पंजाबी आहेत. त्यांच्या या निवडीचा लाभ भाजपला पंजाब व दिल्लीतही होऊ शकतो असे भाजपचे गणित असल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय निरीक्षक व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.