डिझेलच्या दरावरील सरकारचे नियंत्रण हटवण्याचे पाऊल सरकारने उचलले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या उतरलेले असल्याने डिझेलच्या दरांत सहा टक्के कपात होणार आहे. यापुढे पेट्रोलप्रमाणेच डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय तेलाच्या दरांतील चढउतारांवर अवलंबून राहील असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपये ३७ पैसे दरकपात झाल्याने देशभरात ग्राहकांना त्याचा फायदा मिळेल. शनिवारी मध्यरात्रीपासून ही दरकपात लागू होणार आहे. डिझेलवरील सरकारी नियंत्रण हटल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज व एस्सार ऑईल सारख्या खासगी कंपन्यांना फायदा मिळणार आहे.