बोमणामळ-केपे येथे शिकारीच्या फासात बिबट्या अडकला

0
101
पिंजर्‍यात ठेवण्यात आलेला बिबटा. (छाया : गणादीप शेल्डेकर)

केपे शहरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर बोमणामळ – केपे येथे रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या केबलच्या फासात काल एक बिबट्या अडकला. या भागातील भरवस्तीत बिबट्या सापडण्याची ही दुसरी घटना असल्याने या भागात घबराट पसरली असून या परिसरात बिबट्या वाघांचा संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर बिबट्या हा दीड वर्षाचा नर आहे. रात्रीच्या वेळी या भागात रानटी जनावरांचा संचार असतो. गावठी डुक्कर, कुत्री यांची आयतीच शिकार साधण्यासाठी बिबटे वस्तीत येतात. गेल्या काही दिवसात केपे बाजारातील कुत्री अचानक गायब झाली होती तर एक कुत्री गंभीररीत्या जखमी झाली होती. चंद्रेश्‍वर भूतनाथ पर्वताची रांग केपे बाजाराच्या अत्यंत जवळ असल्यामुळे वन्य प्राण्याना केपे बाजाराच्या आसपास पोचणे त्यांना सहज शक्य होते. बिबट्याने फासात अडकल्यावर स्वत:ला सोडवण्यासाठी बराच आटापिटा केला. यावेळी त्याला बघायला लोकांनी गर्दी केली होती.मिळालेल्या माहितीनुसार, बोमणामळ – शिरवई येथे तारांच्या सापळ्यात बिबट्या अडकल्याचे वृत्त कळताच वन खात्याच्या कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले. बोंडला येथून वन खात्याचे पथक मदतकार्यासाठी दाखल झाले.
सकाळी साडेदहाच्या सुमारास आम्हाला बिबट्या सापळ्यात अडकला असल्याची व जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. आम्ही बोंडला येथील वन कर्मचार्‍यांना कळवले व त्यानंतर तासाभरात ते तातडीने घटनास्थळी पोहोचले अशी माहिती वन खात्याचे स्थानिक अधिकारी मिंगेल फर्नांडिस यांनी दिली. यावेळी सातआठशे लोकांचा समुदाय घटनास्थळी गोळा झाला होता. सांगे व केपे तालुक्यातील वन अधिकारी, बोंडलाचे मदत पथक, पोलीस तसेच स्थानिक आमदारही घटनास्थळी दाखल झाले. सापळ्यात अडकल्यानंतर जवळजवळ चार तास हा बिबट्या स्वतःच्या सुटकेचा प्रयत्न करीत होता, मात्र त्याला स्वतःची सुटका करता आली नव्हती. गुंगीची औषधे बिबट्यावर परिणाम करू शकत नसल्याने त्याला नियंत्रणात ठेवणे वन खात्याच्या कर्मचार्‍यांना कठीण झाले. शेवटी म्हादई अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी परेश परब यांनी बिबट्याला सिरिंज टोचून गुंगी दिली व त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पिंजर्‍यात डांबण्यात यश आले. नंतर त्याला बोंडला येथील पशुवैद्यकीय इस्पितळात तपासणीसाठी नेण्यात आले. सकाळी येथील एक नागरिक फिलीप वाझ (५९) हे शेतात गेले असता, एका झुडुपातून त्यांना आवाज ऐकू आला. ते तेथे कोण आहे हे पाहायला गेले असता बिबट्याने त्यांना जखमी केले. त्यांच्या कपाळाला व दंडाला किरकोळ जखमा झाल्या आहेत.