स्त्रीमना कणखर बन!

0
325

– बबीता बाबलो गावस

स्त्रीला सलाम करावा एवढी तू पुढे गेली आहेस. शिकली-सवरली आहेस. महिन्याला पाच आकडी पगार तू घेते आहेस. पुरुषांबरोबर कमावते आहेस. चूल आणि मूल एवढंच काम स्त्रीचं हे ब्रीदवाक्य तू खोडून काढलं आहेस. अनेक जबाबदार्‍या तू अकलेने म्हणा किंवा आपल्या हुशारीने पार पाडते आहेस आणि तरीही तू अबलाच आहेस? समाजाला ताठ मानेने सामोरे जायला तुला झेपलेलं दिसत नाही. आजची स्त्री आहेस ना तू? मग तुला तुझ्यातला आत्मविश्‍वास घट्ट करता आला नाही? हीच तर मोठी खंत आहे.

पूर्वीची स्त्री झाकणाखाली होती. चूल आणि मूल हेच तिचं विश्‍व होतं. घराचा उंबरठा परवानगीशिवाय ओलांडायचा नाही असा कडक दंडक घरातील कर्त्या पुरुषाचा होता, असं म्हटलं जाते; पण मला ते फारसं पटत नाही. पूर्वीची स्त्री जर खंबीर नसती तर छत्रपती शिवाजी घडलेच नसते. झांशीची राणी लक्ष्मीबाईने मुलाला पाठीशी बांधून युद्ध केलेच नसते. गवळी कुटुंबातील हिरकणी गडावरून उतरली नसती अन् स्त्रीची युक्ती आणि शक्तीचे दर्शन घडलेच नसते.
स्त्री कधीच दुर्बल नव्हती. अपवाद सोडल्यास ती कधीच संकटांना घाबरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत नाही. तरुणपणात नवरा वारल्यावरसुद्धा स्त्रीने आपल्या पोटातल्या म्हणा किंवा मांडीवरच्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच अपत्याला कधीच विहिरीत ढकललं नव्हतं. उलट रात्र-दिवस काबाडकष्ट करून स्वत: उपाशी राहून आपल्या पोटच्या गोळ्याचं पालन पोषण केले आहे. आपल्या पोटचा गोळा हेच आता आपलं विश्‍व आहे आणि त्याला घडविणं हेच आपलं उद्दिष्ट आहे हे त्यावेळी कित्येक स्त्रियांनी सिद्ध केलं आहे.
पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळायचे ते स्त्रियांचे धैर्य, त्यांचा चांगुलपणा, त्यांनी दाखविलेला चतुरपणा. पण आज रोज कुणा न कुणा स्त्रीची आत्महत्या, स्त्रीवर झालेले अत्याचार, बलात्कार, छळणूक अशा घृष्णास्पद बातम्यांचे सकाळी सकाळीच दर्शन घडते. यावर गांभीर्याने विचार होताना मात्र दिसत नाही. आजची स्त्री सुशिक्षित आहे. अनेक गोष्टींची तिला जाण आहे. तिला इंग्रजी, इतिहास, विज्ञान समजते आणि तरीही ती फसते आहे. नव्हे तिला कोणीतरी फसवतो आहे आणि त्यात ती फसत चालली आहे. हे असे का?
या सगळ्या प्रकारामागे नव्या युगाची फॅशन तर नाही ना? असा प्रश्‍न सलतो. फॅशनच्या नावाखाली आजची मुलगी किंवा स्त्री स्वत:चे व्यक्तिमत्त्व गमावते आहे. बीनबाह्यांचे, खोल गळ्याचे कपडे घालून, शॉर्ट्‌स घालून मुली-मुलगे टूरला जातात. धांगडधिंगा घालतात. घरच्यांना ती आजची पिढी आहे याचे कौतुक वाटते. पण या फॅशनेबल कपड्यांत गुंडाळलेल्या शरीरात एक नर आणि मादी लपलेली असते त्याचे काय? वयात आलेली ही दोन्ही पात्रं पूरक असतात का? की फक्त टाइमपास?? आणि कालांतराने अशा घटनांमुळे मन अबोल होत जाते आणि शेवटी एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे कुठला तरी पूल! आत्महत्येला कुणीही आपलं करायचे नाही असे आम्ही म्हणतो. मात्र, अशी प्रकरणे हल्ली वाढत चालली आहेत.
हल्लीच एका सुशिक्षित बाईने आपल्या चार वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गोवा हळहळला. ती म्हणे घरच्या छळाला कंटाळली होती म्हणून तिने जिवाचं बरेवाईट केलं. पण तिचे हे कृत्य पटण्यायोग्य नाही. चांगली सरकारी नोकरी होती. ती काय नवर्‍याच्या घरचीच प्रिय होती? तिचे आईवडील जिवंत होते. सरळ नवर्‍याचा त्याग करून मुलीला घेऊन माहेरी जाता आलं असतं. तिथेही तिचा स्वीकार झाला नसता तर एखादी कामवाली ठेवून खासगी खोली घेऊन तिला शक्य होतंच ना? आज अनेक ‘बायलांचा साद’ ऐकणार्‍या संस्था कार्यरत आहेत. कोणाकडे तरी जायला हवं होतंस. कुणी एकाने तरी तुला नक्कीच मदत केली असती.
विवाहितेने आत्महत्या केली. सासरचे लोक चार दिवस कोठडी भोगून येतील. काही वर्षांनी सर्व ठीक होईल. पुन्हा नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होईल यात शंकाच नाही. आजच्या या घडीला नोकरशाही स्त्रियाच जास्त आत्महत्या करताना दिसतात. याचं उत्तर शोधणे कठीण आहे. पण असं घडत आहे. ही एक नक्कीच गंभीर बाब आहे. जन्मत:च स्त्रीमध्ये सहनशक्ती जास्त असते असे म्हटले जाते. ८०% स्त्रिया त्रागा करताना दिसत नाही. त्या घरातील वाद-विवाद शहाणपणाने हाताळतात. लगेच भांडत नाहीत. पण उरलेल्या २०% स्त्रियांत सहनशक्ती जराही नसते. घरात असो वा बाहेर आपला हेकेखोरपणा त्या चालूच ठेवतात. त्यांना आपलच मत खरं करायला आवडतं. कधी कधी समोरचा माणूस समजूतदार असतो. तो समजूनही घेतो; पण जर का समोरची व्यक्ती त्या वीस टक्क्यांतली असेल तर मात्र ते शीतयुद्ध ठरतं. अशा वीस टक्क्यांतले दोन्ही जोडीदार असतील तर मात्र जीवन टोकाला गेल्याशिवाय राहत नाही हे नक्की.
आज आपल्या गोव्यात म्हणा किंवा देशात स्त्रीचे अस्तित्व धोक्यात येऊ नये यासाठी स्त्रीने जागृत झाले पाहिजे. स्त्रीसुद्धा अनेक संकटांना सामोरी जाऊ शकते हे दाखवून दिले पाहिजे. आपण सबला आहोत, जरा हुशार आहोत तद्वत संकटाशी दोन हात करणार्‍या पण आहोत हे पदोपदी सिद्ध करायला हवे. आपल्या जन्मदात्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे. आपण मुलीला जन्म दिला याची खंत न वाटता मुलगीच माझा मुलगा आहे असे ताठ मानेने त्यांनी सांगितले पाहिजे.
………