स्वप्न!

0
166

– दुर्गाश्री सरदेशपांडे,  जीव्हीएम्स उच्च माध्य., फोंडा

आज दुपारी सहज मी डायरीची पाने चाळत बसले होते. रिमझिम बरसणार्‍या त्या पावसाळी वातावरणात, हा एकमेव पर्याय शिल्लक होता. बस्स! त्या एका पानावरून मात्र नजरच हटत नव्हती. कदाचित जे मी पाहिलं ते तुमच्यासाठी विशेष नसेल; पण माझ्यासाठी ती अविस्मरणीय घटना आहे. त्या पानावरती प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे यांचा ऑटोग्राफ होता.

दहावित असताना मी ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक वाचायला आणलेलं आणि तेव्हापासून इच्छा म्हणा वा स्वप्नं, त्यांना एकदा तरी भेटावे ही इच्छा माझ्या डोक्यात आणि मनात अगदी कोरलेली होती. मला नेहमी वाटायचे की हे स्वप्न कधी वास्तवात बदलू शकेल का?
‘‘जितने शिद्दत से तुम्हे पाने की कोशिश की है
हर जर्रे जर्रे ने तुम्हे मिलाने की साजिश की है’’
मला नेहमी वाटायचे की ही वाक्ये फक्त चित्रपटातच लागू होऊ शकतात. हळूहळू ते स्वप्न दूर जात होतं; पण माझ्या मनाच्या एका कोपर्‍यात घर करून बसलं होतं. जर दुसरं काही स्वप्न असतं तर ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणून आपल्या वडिलधार्‍या माणसाने साथ दिली असती. असेल साथ तर जमेल बात, ‘कोण होईल मराठी करोडपती’चं हे वाक्य मला पण म्हणायला मिळालं असतं. कोणीही पालक अशा स्वप्नांना प्रतिसाद देत नसतात. आपलं बालपण आठवा किंवा आतासुद्धा तुमच्या मनात असेल ना कोणत्या तरी मोठ्या दिग्गजांना भेटण्याची इच्छा? लहान मुलांनी म्हटलं, ‘‘आम्हांला सलमान खानला भेटायचे आहे.’’ किती पालक असे असेल जे मुकाट्याने ‘हो करूया की तुझी इच्छा पूर्ण’ हे वाक्य म्हणतील?
मी अकरावीचा पडाव पार केल्यानंतर उत्तम कांबळे फोंडा येथील विश्‍व हिंदू परिषद सभागृहामध्ये ‘आई समजून घेताना’ ह्या विषयावर व्याख्यानमाला देणार असे वृत्तपत्रात वाचले. ही वार्ता खरीच आहे ना? असा प्रश्‍न माझ्या मनात तरंगू लागला. आपलं स्वप्नं काही अंतरावरच आहे हे जेव्हा जाणवते त्यावेळी काय करावे, काय नाही हे काही सुचतच नसते. आणि वेळेची गणना सुरू झाली. पंधरा दिवस, सोळा तास, पाच मिनिटे, दोन सेकंद… प्रतीक्षा करणारी नजर थांबली आणि त्यांना पुढे पाहिल्यावर काय सांगू तुम्हांला?
‘किती सांगू मी सांगू तुम्हांला आज आनंदी आनंद झाला’ अशी काही अवस्था होती. त्यांच्याशी बोलणं पण झालं. ‘जितने शिद्दत से’ ही शायरी आता पुन्हा आठवली. आता विश्‍वास झाला की, स्वप्न फक्त ‘ओम शांती ओम’च्या ओमचीच पूर्ण होत नसतात तर आपली पण पूर्ण होत असतात.
स्वप्न आणि वास्तव हे जरी वेगळे शब्द असले तरी स्वप्नापासूनच वास्तविकता जागी होत असते. कुठलंही स्वप्न असू द्या, त्याला वास्तवात आणण्यासाठी पाया आपल्यालाच बांधावा लागतो. तुम्हांला फक्त एवढंच करायचं आहे, तुमच्या इच्छेला वा स्वप्नाला तुमच्या मनातून मिटायला देऊ नका. तुम्हांला ज्या कालावधीत एक गोष्ट पाहिजे त्यावेळी ती मिळाली नाही म्हणून त्या गोष्टीला सोडून जाऊ नका. नक्की, थोड्या दिवसांनी तुमचा डेस्टिनेशन पॉईंट मिळेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा…
‘‘राह पे कॉंटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपाले सुरज मगर
रात को एक दिन ढलना ही है
रुत ये टल जाएगी
सुबह फिर आयेगी’’