अल कायदा आणि आयएसआयएस गोव्यासह देशातील काही महत्त्वाच्या पर्यटनकेंद्रांवर दहशतवादी हल्ले चढवण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा राष्ट्रीय सुरक्षा दलाने दिल्यानंतर गोव्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, हा इशारा केवळ गोव्यासाठी म्हणून दिला गेलेला नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले असले, तरी यापूर्वी गोव्याला लक्ष्य करण्याचे मनसुबे दहशतवाद्यांनी एकदा नव्हे, तर अनेकदा आखले होते असे दिसून येते.इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासिन भटकळ याने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनएसए) दिलेल्या जबानीत काही काळ आपले गोव्यात वास्तव्य होते असे सांगितले होते. आपल्याला स्थानिकांकडून सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे आपण दहशतवादी हल्ल्याचा बेत तडीस नेऊ शकलो नाही, असे भटकळने सांगितले असले, तरी गोव्यात दहशतवाद्यांची दहा मॉड्यूल्स कार्यरत असल्याचा संशय असल्याचे काही वर्षांपूर्वी केंद्रीय गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला कळवले होते.
२००८ साली कर्नाटकमधील इंडियन मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी रियासुद्दिन नासीर ऊर्फ महंमद घौस हा गोव्यात पाच ठिकाणांची ‘रेकी’ करून गेला होता. या पाच ठिकाणी वाहनांमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणण्याचा त्याचा बेत होता. त्याच्या पूर्वतयारीसाठी ही ठिकाणे निश्चित करण्यासाठी तो गोव्यात आला होता. विदेशी पर्यटकांची वर्दळ कोठे जास्त असते ती ठिकाणे निश्चित करण्याचे काम त्याच्यावर भटकळ बंधूंनी सोपवले होते. तेव्हाच गोव्यातील ज्यूधर्मीयांची प्रार्थना केंद्रे म्हणजे छबाड असलेल्या हणजूण व हरमल येथील वास्तूंचीही त्याने ङ्गरेकीफ केली होती. गोव्याहून परत जात असताना कर्नाटक पोलिसांनी वाहनाची कागदपत्रे नीट नसल्याने वाहनचोरीच्या संशयावरून त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याचे खरे स्वरूप उघडकीस आले होते. केवळ सुदैवानेच तेव्हा गोव्यात काही घातपात घडवणे त्याला व त्याच्या साथीदारांना शक्य झाले नाही. त्याने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अजमल कसाबसमवेत पाकिस्तानात दहशतवादी कृत्यांचे प्रशिक्षण घेतले होते. अमेरिकेत पकडला गेलेला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हीड कोलमन हेडली याने मुंबई व इतर शहरांप्रमाणेच गोव्यातही दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चाचपणी केली होती. गोव्यात अमेरिकी, ब्रिटीश व इस्रायली पर्यटकांना लक्ष्य करण्यासंदर्भात आपण पाहणी केली होती असे हेडलीने त्याची जबानी घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकार्यांना सांगितले होते.
महंमद आसीफ या हुबळी येथील वैद्यकीय विद्यार्थ्याला मध्यंतरी दहशतवाद्यांशी संंबंध असल्याच्या संशयावरून पकडले गेले होते, तेव्हा त्यानेही गोव्यात घातपात घडवण्याचा आपला प्रयत्न होता अशी कबुली दिली होती.
तारीक बाटलू या काश्मिरी दहशतवाद्याला गोव्यातच पकडले गेले होते आणि वेर्णा येथे पकडल्या गेलेल्या एका संशयिताचे म्हापशात दीड महिना वास्तव्य होते. छोटा राजन टोळीतील उमेद उर रेहमान हा गुंड हरमल येथे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भाड्याच्या घरात राहात होता. या सर्व घटना लक्षात घेतल्या, तर गोव्यावर दहशतवादाचे किती गंभीर संकट आहे याची कल्पना येते. विदेशी पर्यटकांबरोबरच गोव्यात वास्तव्य करून असलेल्या ज्यू धर्मीयांवर अल कायदा व आयएसआयएसचा रोख असण्याची अधिक शक्यता आहे. इस्रायलींसाठी गोव्यात हणजूण येथे इंटरनॅशनल हाऊस ऑफ प्रेयर म्हणजे छबाड हाऊस चालवले जाते. गुरू नामक व्यक्ती हे केंद्र चालवते. इस्रायली नववर्षदिनी येथे मोठा कर्र्यक्रम होत असतो. छबाड हाऊसला भेट देणार्यांना तेव्हा मोफत खाद्यपदार्थ वाटले जातात. विदेशातून येणारे इस्रायली या छबाड हाऊसला भेट दिल्यावाचून सहसा राहत नाहीत. मेंडेल ऑर्नेस्टीन व गॅजर एलीयझर हे अमेरिकेतील ब्रुकलीन येथील दोघे विदेशी नागरिक हे घर भाड्याने देतात. जेव्हा तेथे प्रार्थना आयोजित केल्या जातात तेव्हा तेथे कडेकोट सुरक्षा पुरविली जात असते असे सांगण्यात येते. गोव्यात येणार्या इस्रायलींसाठी मडगावात एक संस्थाही चालवली जात असून कायमस्वरूपी प्रार्थनाकेंद्र उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. २००९ पासून त्यांचे काम चालत आले आहे. मात्र, गोव्यातील बदलत्या परिस्थितीत अशा गोष्टींना लक्ष्य केले जाण्याची शक्यता बळावली आहे. सेंट झेवियर शवदर्शन सोहळा, नववर्ष दिन, ख्रिसमस आदी येऊ घातले असल्याने या दहशतवादाच्या धोक्याचा मुकाबला करणे आव्हान ठरले आहे.
सुरक्षासंदर्भात तीनही सैन्यदल प्रमुखांशी पंतप्रधानांची चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सैन्यदलाच्या तीनही प्रमुखांची भेट घेऊन बैठकीमध्ये हवाई, सायबर स्पेस आणि अन्य विशेष अभियानांदरम्यान येणारी आव्हाने व सुरक्षासंदर्भात धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना हव्या यासंदर्भात चर्चा केली. या बैठकीत देशातील तसेच देशाबाहेरील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्याने कोणती तयारी केली आहे याची माहितीही पंतप्रधानांनी सैन्य प्रमुखांकडून घेतली. संरक्षण मंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बैठकीला उपस्थित होत्या.