आमदार बाबुश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात तसेच त्यांच्या समर्थकांनी बेकायदा जमाव करून १९ फेब्रुवारी २००८ साली पणजी पोलीस ठाण्यावर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेची हानी केली होती. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेला गुन्हा व आरोपपत्र रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर म्हापसा सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर काल १७ रोजी आरोप निश्चित करणार होते. पण संशयितांपैकी दोघेजण हजर राहू न शकल्याने पुढील सुनावणी २० रोजी दुपारी २.३० वाजता पुढे ढकलण्यात आली. गेल्या बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित करावयाचे होते. पण आमदार बाबुश मोन्सेरात यांनी आपल्याला वकील बदलायचा आहे, त्यासाठी पुढील तारीख द्यावी असा अर्ज केला असता न्यायालयाने १७ ही तारीख दिली होती. पण काल संशयितांपैकी दोघेजण न आल्याने ती तारीख २० रोजीपर्यंत पुढे ढकलण्यात आली.