मुख्यमंत्र्यांचे टीकेला प्रत्युत्तर
दाबोळी विमानतळ कायम खुला राहणार असल्याचे नमूद केले असताना काहीजण विनाकारण जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात.
मोपा विमानतळाच्या आरएफक्यूच्या पहिल्या कलमात दाबोळी विमानतळ कायम खुला राहणार असल्याचे नमूद केले असताना काहीजण विनाकारण जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या मंत्र्यांनी संशय व्यक्त केला होता त्याच्या प्रश्नाची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले आहे. गोव्यात काही वर्षानी पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने दाबोळी विमानतळ पुरेसा नाही. आताच वेळेची मर्यादा असून रात्रौ येणार्या विमानासाठी तो खुला ठेवण्यात येत नाही. मुंबई येथे सुध्दा रात्रौ १२ ते पहाटे पाचपर्यंत बंद असतो, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.नोव्हेंबर महिन्यात आपण दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी बैठका घेऊन जनतेमध्ये असलेल्या संशयाबद्दल चर्चा करू. आपण यावर पूर्ण अभ्यास केला असून कोणत्याही शंकाकुशंकाचे उत्तर देऊ शकतो, असे ते म्हणाले. चार्टर विमानातून एका तासाला १७०० पर्यटक येत असतात. सध्या पार्किंगसाठी येथे जागा नाही. नेव्हीशी संपर्क साधून विमान पार्किंगसाठी जागा मिळविण्यात येणार आहे. नौदलाला गोव्यातून हटविणे हे राष्ट्राच्या हिताचे नाही. सुरक्षेच्या प्रश्नाकडे आपण तितक्याच तीव्रतेने पाहिले पाहिजे.
मोपा विमानतळ बांधकामासाठी जो खाजगी ठेकेदार येईल तो आपल्या कायद्याचा विचार करूनच गुंतवणूक करेल. त्यासाठी ३७० एकर जमीन व्यापारी उद्योगासाठी देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मोपा विमानतळ सुरू होत आहे असे विधान आपण केले नव्हते. गोवा सरकारने पर्यटकांसाठी ज्या साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याचा फायदा गोमंतकीयांना होतो. सिंधुदुर्गात तेथील सरकारने पर्यटकांसाठी साधनसुविधा उपलब्ध केल्यास मोपा विमानतळ झाल्यानंतर फायदा होऊ शकेल, असे आपण सांगितले होते, असे त्यांनी सांगितले. विनाकारण काही बिगर सरकारी संस्था प्रतिनिधी वा लोकनियुक्त प्रतिनिधी लोकांचा गैरसमज करून देत आहोत. पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने मोपा विमानतळाची गोव्यासाठी गरज भासणार आहे. गोवा फॉर दाबोळी ‘आन्ली’ यांचे निमंत्रक फा. एरेमिता रिबेलो, आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला फायदा मिळवून देण्यासाठी मोपा विमानतळ सुरू करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.