महाराष्ट्र, हरयाणात आज निवडणूक

0
84

महाराष्ट् व हरयाणा राज्यात आज विधानसभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपसाठी ही विशेष प्रतिष्ठेची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनीही दोन्ही राज्यांत भाजपला स्वबळावर निवडून आणण्याचा विडा उचलला असून दहा दिवसांत दोन्ही राज्यात त्यांनी ३८ सभा घेतल्या आहेत. महाराष्ट्राकडे यावेळी सर्वांचे विशेष लक्ष असून याठिकाणी भाजप – शिवसेना २५ वर्षांची व कॉंग्रेस – राष्ट्रवादी १५ वर्षांची यूती तोडून एकटे निवडणूक लढवत आहेत. हरयाणातही गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेससमोर भाजपने एकाकी आव्हान उभे केले आहे.
निवडणूक आज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत चालेल. मतमोजणी रविवार दि. १९ रोजी होणार आहे.दरम्यान, मोदींव्यतिरिक्त कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्धव व पूत्र आदित्य ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अन्य स्टार कँपेनर्स होते.
महाराष्ट विधानसभेच्या २८८ मतदारसंघात ८.२५ मतदार आहेत. एकुण ४११९ उमेदवार रिंगणात आहेत. येथे कॉंग्रेसने २८७, भाजपने २८०, शिवसेनेने २८२, राष्ट्रवादीने २७८, मनसेने २१९ उमेदवार उभे केले आहेत.
महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे उमेदवार – उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे, सुभाष देसाई, सुरेश जैन, राष्ट्रवादीतून सेनेत गेलेले दीपक केसरकर, माजी मंत्री पतंगराव कदम, शिवाजीराव मोघे, राजेंद्र दर्डा व मनसेचे बाळा नांदगावकर.
हरयाणात ९० जागांसाठी १३५१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात १०९ महिला उमेदवार आहेत. एकुण १.६३ कोटी मतदार येथे आहेत. यात ८७.३७ लाख महिला मतदार आहेत. याठिकाणी कॉंग्रेस – भाजपने प्रत्येकी ९० उमेदवार, बसपने ८७, कम्युनिस्ट पार्टीने १४ तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १७ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
हरयाणातील प्रमुख उमेदवार – मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, रणदीप सुर्जेवाला, माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे पूत्र अभय, सून नैना, नातू दुश्यंत, माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा व त्यांच्या पत्नी शक्ती रानी, माजी खासदार कुलदीप बिश्‍नोई, त्यांच्या पत्नी रेणुका, थोरले बंधू चंदर मोहन.