मनसेला सत्ता द्या : राज ठाकरे

0
93
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर काल आयोजित मनसे उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरे. समोर उपस्थित जनसमुदाय.(छाया : हरिश्‍चंद्र पवार)

सावंतवाडीत जाहीर सभा

महाराष्ट्रातील जनतेने सर्व राजकीय पक्षांचे प्रयोग करून बघितले. मात्र या सर्वच पक्षांनी विकासाच्या नावाने राज्यात धिंगाणा घातला. माझ्या पक्षाकडे भविष्याचा वेध घेणारा विकासाचा आराखडा आहे. त्यामुळे एकदा महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंच्या हातात देऊन बघा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले.येथील मनसेचे उमेदवार परशुराम उपरकर यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी जिमखाना मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा झाली. यावेळी व्यासपीठावर परशुराम उपरकर, अविनाश अभ्यंकर, कोल्हापूरचे उमेदवार सुरेश साळोखे, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, जिल्हाध्यक्ष धीरज परब आदी उपस्थित होते.
कोकणात सुंदर समुद्र किनारा आहे. गडकिल्ले आहेत, आंबोली हिलस्टेशन आहे. येथे मोठ्या प्रमाणवर पर्यटनवाढीला चालना आहे. मात्र हे पर्यटन सोडून मायनिंग आणि विनाशकारी प्रकल्प कोकणात आणू पाहणार्‍या या राज्यकर्त्यांना विकासाची दृष्टीच नाही, असा दावा यावेळी राज ठाकरे यांनी केला. तर शेजारचे गोवा राज्य १० हजार नोकर्‍या देवू शकते मग महाराष्ट्रात रोजगार का मिळू शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जनतेने हे राज्य एकदा माझ्या हातात चालविण्यास द्यावे. येथे पर्यटनाच्या माध्यमातून वर्षाचे उत्पन्न १० ते १५ हजार कोटीने वाढवीन व १० लाख रोजगार तरुणांना देईन, असे त्यांनी सांगितले. विदर्भात मोठ्या प्रमाणावर संत्र्यांचे उत्पन्न होते. त्यामुळे तेथील शेतकरी करोडपती झाले आहेत. मात्र कोकणातला आंबा शेतकरी आजही गरीब आहे.
या कोकणात आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत मग या शेतकर्‍यांना चांगले दिवस कसे येणार? फक्त जमिनी लाटून आणि मायनिंग आणून या भागाचा विकास होणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं, असे ते म्हणाले.