‘आप’चे आता ‘मिशन विस्तार’

0
83

अधिकाधिक लोकांना पक्षात सहभागी करणार
जास्तीत जास्त लोकांना आम आदमी पार्टीत सहभागी करून घेण्यासाठी पक्षाने देश पातळीवर ‘मिशन विस्तार’ नावाची मोहीम हाती घेतलेली असून वर्षभराच्या काळात देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे कार्यकर्ते असतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गोव्यासह २० राज्यांत यापूर्वीच ही मोहीम सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मिशन विस्तार’ योजनेच्या वेळी जे लोक ‘आम आदमी’ पक्षात सहभागी होतील त्यांच्यावर पक्ष महत्त्वाची जबाबदारी सोपवू पाहत असल्याची माहितीही पंकज गुप्ता यांनी यावेळी दिली. लोंबटे, कुलकर्णी गोवा निरीक्षकआम आदमी पार्टीने गोव्यासाठीचे निरीक्षक म्हणून आपल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या फळीतील आघाडीचे नेते सुभाष लोंबटे व सलमा कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. मिशन विस्तारसाठीच्या गोव्यातील कार्यकर्त्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. हे कार्यकर्ते गोव्यातील मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे काम हाती घेतील. तसेच विविध स्तरांवर पक्षांतर्गत निवडणुका घेऊन तळागाळात पक्षाचा विस्तार करण्याचे काम करतील, असे त्यांनी सांगितले. गोव्यातील नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या मिशन विस्तार कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी पंकज गुप्ता यांनी केले.