शेतातला माळा

0
1120

– संदीप मणेरीकर

‘काय रे, माळ्याक जावक इलंय?’ आजीने कोणाला तरी विचारलं. मी बाहेर जाऊन पाहिलं तर आमच्याच आवाठातला गंगाराम हातात कंदील, काठी व दुसर्‍या हातात अंथरूणाची वळकटी व काखेला एक पिशवी, तीत चार सेलची झगझगीत उजेड पडणारी अशी बॅटरी एवढी सामग्री घेऊन पायरीवर उभा होता. ‘बस रे, जरा भाकरी खातय!’ आतून दादांनी (माझ्या बाबांनी) सांगितलं आणि गंगाराम आमच्या घराच्या ओसरीवर सिमेंटने बांधलेल्या सोफ्यावर बसला. 

दादा व गंगाराम आमच्या शेतात, आम्ही त्याला वायंगण म्हणतो, अजूनही तिथे शेताची राखण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या माळ्याला जाण्यासाठी जात होते. (ज्याला ‘माचा’ असं म्हणतात.) त्याला ‘वरचा माळा’ व ‘खालचा माळा’ म्हणत. शेतात भाताचं पीक घेतलं जायचं. वर्षातून दोन पीकं घेतली जात होती. पावसात व उन्हाळ्यात दोन्ही वेळेला बहुतेक करून भाताचं (तांदळाचं) पीक घेतलं जायचं. तरवा किंवा पेरणी काहीही असलं तरी, लहान लहान रोपं शेतातील वाफ्यांत, ज्यांना ‘कुणगे’ म्हणत, त्यात डोकावू लागली की त्यांची राखण करण्याचं काम सुरू व्हायचं. त्यासाठी हा माळा उभारला जायचा. कधीकधी गावातून, आवाठातून कोणीतरी दादांना, माळ्यासाठी मुहूर्त विचारायचा. पंचांगातही मेढ मारण्याचा मुहूर्त दिलेला असतो. ते सारं पाहून दादा त्यांना ती वेळ, तारीख सांगायचे. त्याप्रमाणे आमच्या वायंगणातील माळ्यालाही तेच सोपस्कार लागू व्हायचे. मेढ मारण्याचा मुहूर्त झाला की, त्यावेळी अगोदर निश्‍चित केलेल्या माळ्याच्या जागेवर एक मेढ मारली जाते. त्यानंतर कधीतरी आठवड्याभरात माळा पूर्ण व्हायचा. माळा म्हणजे चार उंच मेढी, त्यावर पोफळींच्या चुडतांचा (झावळ्यांचा) थर, ऊन वा दवापासून संरक्षण होण्यासाठी तयार केलेला आसरा. पावसात त्यावर प्लॅस्टिकचं आवरण घातलं जायचं. त्यामुळे पावसापासून सरंक्षण केलं जात असे. त्याखाली साधारण दोन ते अडीच फुटांवर पोफळीच्या लांब पट्ट्या, कांबी एकाला एक जोडून आडव्या-उभ्या जोडल्या जात. त्यावर झोपण्याची व्यवस्था होत होती. म्हणजे तेवढ्या रुंदी व लांबीचा तो थर असे. त्यावर कांबळ आणि त्यावर अंथरूणाची वळकटी. जमिनीपासून साधारण सहा-सात फुटांवर ही सोय केलेली असायची. तिथे चढण्यासाठी समोरच्या बाजूच्या मेढींवर आडवा बांबू बांधला जायचा. अशा या एकंदर माळ्याची रचना असायची. क्वचित खाली जमिनीपासून दोन फूट अंतरावर कांबीचा एक थर असायचा. त्यावर कुत्र्याची सोय केलेली असायची. असा एकंदर माळ्याचा थाट! जमिनीपासून सुमारे आठ फूट उंचीचा हा माळा. तसाच खाली दुसरा माळा; पण हाकेच्या अंतरावर. एका माळ्यावर दादा तर दुसर्‍यावर गंगाराम झोपायला जायचे.
अगदी छोटी-छोटी रोपं उगवायला लागली की नानाविध जनावरं ती खाण्यासाठी वायंगणावर आक्रमण करत. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी, शेताचं राखण करण्यासाठी हा माळा घातला जाई. डुक्कर, पक्षी, मेरू, गवेरेडे, या सगळ्यांपासून रक्षण करताना ‘माळेकरी’ कधी झोपत असा प्रश्‍न मला सतत पडलेला असे. थोडीशी जरी झोप लागली तरी कधीही प्राण्यांचा कळप शेतात घुसून शेतीची नासधूस करेल सांगता येत नाही, अशी अवस्था असल्याने अत्यंत जागरूकपणे झोप घ्यावी लागे. जाग आल्यावर उशाशी असलेल्या ‘फुल्ल’ बॅटरीने शेतात चोहोबाजूंनी उजेड टाकून बारीक डोळ्यांनी व सजग नजरेनं अशा जनावरांचा शोध घेतला जाई. क्वचित प्रसंगी दादा बंदूक घेऊन माळ्याला जात. बंदुकीने डुकराची शिकारही करीत. त्यावेळी शिकारीला निर्बंध नव्हते. वन्यप्राण्यांविषयी आस्था होती, पण नाहक त्रास देणार्‍यांना शिक्षाही दिली जाई. अशा डुकरांची दादांनी कितीतरीवेळा शिकार केलेली होती. ही शिकार झाल्यानंतर दादा आम्हांला दुसर्‍या दिवशी सकाळी उठवून तो डुकर दाखवत होते. गावातील लोक येऊन ती शिकार घेऊन जात. दादांना त्या शिकारीच्या बदल्यात काय देत ते मला अजूनही कळलेलं नाही. परंतु त्याचा मोबदला मिळो वा न मिळो, दादा शिकारीचं काम करीत आणि असा एखादा डुक्कर पडला की आजूबाजूच्या शेतातील माळेकरीही पुढे आठवडाभर सुखाने माळ्यावर झोपत.
माचाच्या खाली कंदील पेटवून ठेवला जायचा. बारीक वात करून मिणमिणता उजेड करून कंदील समईच्या ज्योतीप्रमाणे तेवत रहायचा. हा कंदील पेटवून ठेवण्यामागे त्या माळ्यावर राखणीसाठी कोणीतरी आलेलं आहे ही खूण. त्यामुळे एखाद्याला भीती वाटत असेल (जर) तर त्याला धीर मिळेल, आणि शेतात येणार्‍या जनावरांनाही थोडी भीती, दरारा वाटायचा. अर्थात काही निर्भीड जनावरं त्याही उजेडाला न घाबरता बिनधास्त शेतात घुसायची. आमच्या वायंगणाच्या खाली एक लहानसा ओहोळ आहे. त्याच्या पलीकडे एक मोठे शेत आहे. तिथे बरेच जण मिळून एकत्र शेती करायचे. तिथे साधारण सात-आठ माळे असायचे. ओहोळात पाणी पिण्यासाठी आलेली जनावरे आमच्या वायंगणात किंवा त्या शेतात जायची. तिथले माळेकरी हातात असलेला मोठा दंडुका माळ्याच्या मेढीवर मारून मोठ्याने आवाज करायचे. त्यावरून आजूबाजूचे माळेकरी सावध होऊन तसाच आवाज करीत. त्यामुळे अचानक सुरू झालेल्या त्या आवाजाने ते जनावर, तो कळप भेदरून जायचा आणि मग तिथून पळ काढायचा.
काहीजण शेतात एखादा पत्र्याचा डबा ठेवायचे व त्यावर एका काठीने तो डबा वाजवायचा. त्यामुळेही जनावरे भेदरून पळून जात असत. किंवा कोणी दोन ते पाच फूट वाळलेल्या सुपारीची सालं, ज्याला ‘सोलं’ म्हणतात त्याची एक सरळ रेष करायची दोन वीत रुंदीची, त्यात गोवर्‍यांचे तुकडे वगैरे घालायचे आणि मग एका बाजूने ती पेटवायची. ती पेटवायला हवी पण तिची ज्वाला नव्हे तर नुसतीच पेटायला हवी. दोन-तीन तासांपर्यंत ती तशी पेटत रहायला हवी. त्याला ‘धुकटी’ म्हणतात. ती पेटून उठू नये म्हणून सालीवर पाणी टाकलं जाई. मग ती हळूहळू पेटत राही. निखार्‍यांसारखी पण तिची ज्योत होत नव्हती. असाही प्रयोग करून शेतकरी जनावरांपासून शेतीचं रक्षण करीत. मात्र, या सर्व प्रयत्नांना दाद देत नाहीत असं लक्षात आल्यावर त्या जनावरांची शिकार केली जाई. थोडक्यात साम, दाम, (हे खरं तर नाही) दंड वगैरेंचा वापर केला जाई. शेवटी दंड म्हणून शिकार.
आमच्या वायंगणाच्या खाली आणखी एक शेत होतं. त्याला मोर्लेकरांची पुरण म्हणत. तिथेही कधीतरी शेती केली जाई. तिथेही माळा होता. त्या माळ्यावर कोणीतरी माळेकरी जात असे. सुट्टीच्या दिवसात या माळ्यावर दिवसा आम्ही जात असू. त्या ठिकाणी दोन माळे जरी असले तरी वरच्या माळ्यावरच आमचं बस्तान असायचं. त्या माळ्यावर दादा झोपायचे. दादांच्या अंथरूणाला हात न लावता आम्ही आमची नाटकं करायचो. कारण जरा जरी अंथरूण हललेलं असलं तरी दादांना ते कळायचं आणि मग आम्हांला ओरडून घ्यावं लागायचं. शेतातील रोपांवर दाणे भरू लागले की, विविध चिमण्या, पाखरं भिरभिरू लागायची. त्यांना हुसकावून लावण्यासाठी मी, भाई, माझी बहीण अशी माळ्यावर बसायचो. मोठमोठ्यानं गाणी म्हणायची, डबा वाजवायचा. (बडवायचा). कधी आमच्या शेजारच्या घरातील आमचे भाऊ-बहीणही उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेले असायचे. अशावेळी आमची सगळ्यांची फौज त्या माळ्यावर जमायची. मग विविध खेळ, नाटकं, गाणी, अंताक्षरी यांना बहर यायचा. आमच्या कंपूत सावंतवाडीहून आलेल्या वर्षा, पराग, चतुरा, चारूता, मनोज यांचा सहभाग असायचा. ती त्यांच्याकडील विविध कला सादर करायचे. त्या माळ्याचा उपयोग कधी कधी आम्ही गाडी (बस) म्हणून करायचो. त्यावेळी एकाच माळ्यावर सारेजण बसायचो आणि माळ्याच्या सगळ्या मेढी हलवून माळा सैल करून सोडत होतो. नंतर दादांकडून बोलणीही खावी लागत.
या माळ्यावर बसल्यावर सभोवताली पाहिलं तर सुंदर चित्र दिसायचं. हिरवगार शेत, त्यावर नुकतेच दुधाने भरलेले भाताचे दाणे, त्यावर पिवळ्या रंगाची फुलपाखरं ज्याला ‘पिंगाणी’ म्हणतात ती फेर धरून नाचताहेत, मध्येच चिमण्यांचा थवा उडत येतो व त्या दाण्यांतील दूध पिऊ (की खाऊ) लागतो. भिरमोट्या (भिंगर्‍या) फिरत फिरत एखाद्या भाताच्या रोपावर बसतात, मध्येच वार्‍याची हलकीशी गार झुळूक… कुठल्या एअरकंडिशनर खोलीत वा विकासाच्या नावाखाली फुगलेल्या शहरातील फ्लॅटमध्ये असा अत्यानंद अनुभवता येईल का?
या माळ्यावरून मग आम्हांला नाटकं सुचायची. हा साधा चार मेढी उभारून केलेला शेताच्या राखणदाराचा रखवालदार अचानक ऐतिहासिक रूपं घ्यायचा. त्याच्यावर पत्ते, बसचे चालक – वाहक, प्रवासी होऊन खेळणारे आम्ही सवंगडी सह्यगीरीच्या दर्‍या-खोर्‍यांतून हिंडणारे, स्वराज्याची शपथ घेणारे मावळे व्हायचो आणि हा माळा म्हणजे मग कधी रायगड, तोरणा, प्रतापगड बनायचा. आमच्या नाट्यकलेची आवड बहुधा इथेच रुजली, स्फुरली असावी तशीच लेखनाची स्फूर्तीही याच रम्य वातावरणाने दिली.
उन्हाळ्याच्या दिवसांत माळ्यावर बसल्यानंतर समोर पिवळ्या, तांबड्या काजूंनी (बोंडवांनी) लगडलेली झाडं दिसायची. आंब्यांच्या झाडांवर घमघमाट, त्यात कोकमाच्या झाडांवर पानांपेक्षाही जास्त लागलेली कोकमे हे सारं पाहूनच मन थक्क आणि प्रफुल्लीत व्हायचं.
आज परिस्थिती खूप बदललेली आहे. शेती करायची तर शेतीकामासाठी माणसं मिळत नाहीत. आजूबाजूच्या डोंगरांवर मनुष्यानेच हल्ला केल्याने तेथील जंगली जनावरे या शेतीवर दिवसा-ढवळ्या डल्ला मारत आहेत. त्यामुळे स्वत:च्या पोटासाठी शेती होत नसून या जंगली जनावरांच्या पोटासाठीच शेती होत असल्यामुळे लोकांनी शेती सोडलेली आहे. कामाला मजूर मिळत नाहीत. शिकलेल्या युवकांना शेतीच्या कामापेक्षा नोकरीत जास्त रस असल्यामुळे असे युवक झटपट पैसा कमावण्यासाठी शहरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे आज कितीतरी जमिनी पडिक आहेत. गावाकडे असणारी वृद्ध माणसे मुलाने पाठवलेल्या मनीऑर्डरवर जगत आहेत. त्यामुळे पूर्वी जे लोक शेती (अर्धलीला) म्हणजे अर्धी-अर्धी तरी करूया म्हणून यायचे तेच आता ‘माका नाय रे बाबा जमना’ म्हणून टाळाटाळ करू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी राजऐश्‍वर्य भोगलेल्या शेताची राखणदार म्हणून मिरवणार्‍या या ‘माळ्याला’ आज कुठेच जागा नसल्याने एकेकाळच्या श्रीमंत ग्रामीण भागातील आणखी एक मोती आधुनिकतेच्या तंत्रज्ञानाचा शिकार बनून ओघळत चालला आहे.
……….