दुसरा विमानतळ परवडणारा नाही
गोव्याची अस्मिता व संस्कृती यांच्या रक्षणासाठी गोव्याला विशेष दर्जाची आवश्यकता असून त्यासाठीची संधी गोव्याने अजून गमावलेली नसून प्रयत्न केल्यास हा दर्जा अजूनही गोव्याला मिळू शकतो, असे नवे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गुरुवारी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.मोप विमानतळाविषयी बोलताना मात्र राज्याला दुसर्या विमानतळाची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यात दोन विमानतळ चालू शकणार नसल्याचे ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाशी गद्दारी केलेल्या नेत्यांविषयी बोलताना ते म्हणाले की पक्षाला ब्लॅकमेल करून पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना पक्षाची दारे कायमची बंद करण्यात आलेली असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही.
दक्षिण गोव्यातील कट्टर विरोधक चर्चिल आलेमांव यांच्याविषयी तुमच्या मनात अजूनही कटुता आहे का या प्रश्नावर बोलताना चर्चिल यांच्याविषयी आता मनात तशी भावना नसल्याचे फालेरो यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जॉन फर्नांडिस यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करून त्या जागी लुईझिन फालेरो यांना बसवण्यात आले असले तरी कॉंग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे दिसत नसून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व दाबोळी मतदारसंघाचे आमदार मॉविन गुदिन्हो यानी जॉन फर्नांडिस व लुईझिन फालेरो यांच्यात कोणताही फरक नाही. फालेरो हेही पक्षातील सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.