नव्या मराठी अकादमीच्या बैठकीत ठराव
कर्मचार्यांना सामावून घेण्यात यावे
रायबंदरऐवजी पणजीत कार्यालय हवे
गोमंतक मराठी अकादमीच्या कर्मचारीवर्गाला त्यांचे गेल्या सात महिन्यांचे थकित वेतन त्वरित द्यावे, तसेच नव्या गोवा मराठी अकादमीमध्ये त्यांना सामावून घेऊन त्यांच्या अनुभवाचा लाभ नव्या संस्थेला मिळवून द्यावा असे महत्त्वपूर्ण ठराव नव्या गोवा मराठी अकादमीच्या काल झालेल्या अस्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आले. रायबंदर येथे नव्या अकादमीसाठी सरकारने देऊ केलेली जागा गैरसोयीची असल्याने पणजी शहरातच मध्यवर्ती ठिकाणी अकादमीसाठी जागा द्यावी अशी विनंतीही सरकारला करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. प्राचार्य अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस श्री. आनंद मयेकर वगळता सर्व सदस्य उपस्थित होते.या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना प्राचार्य श्री. सामंत म्हणाले की, गोमंतक मराठी अकादमीचा कर्मचारीवर्ग गेले सात महिने मासिक वेतनाविना आहे, ही मानवतेच्या दृष्टिकोनातून खूपच दुःखाची गोष्ट आहे. मराठीचे काम करण्यासाठी ज्या कर्मचार्यांनी गेली कित्येक वर्षे परिश्रम केले, त्यांना मासिक वेतनही मिळू नये याचे आम्हा सर्व सदस्यांना मनस्वी दुःख होते. त्यामुळे त्यांना हे वेतन लवकरात लवकर देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना करण्यात येईल.
या गोमंतक मराठी अकादमीच्या कर्मचार्यांना नव्या अकादमीत सामावून घेण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे, ते केले जावे अशी विनंतीही सरकारला करण्याचे ठरवण्यात आले आहे. नव्या मराठी अकादमीमध्ये गोमंतकातील सगळ्या गटांतील सर्वांना सहभागी होता यावे, त्यांना त्या ठिकाणी अधिकार असावेत, कार्यक्रमांमध्ये त्यांना सूचना करता याव्यात अशा प्रकारची काही योजना नव्या संस्थेच्या घटनेमध्ये करण्यात येत आहे. सर्व सदस्यांनी अनेक नव्या सूचना आजवरच्या बैठकांतून केल्या आहेत, त्यांचा विचार करून ज्यांना ज्यांना मराठीचे काम करायचे आहे त्या सगळ्यांचा समावेश करून या नव्या अकादमीची घटना बनवण्यात येत असल्याचे प्राचार्य सामंत यांनी सांगितले. येत्या महिन्याभरामध्ये ही घटना पूर्ण होईल व त्यानंतर नव्या अकादमीच्या प्रत्यक्ष कार्याला सुरूवात होईल असे प्राचार्य सामंत यांनी सांगितले.
ही अकादमी आपलीच आहे असा दृष्टिकोन ठेवून मराठीप्रेमींनी आम्हाला सूचना कराव्यात. नव्या अकादमीची वेबसाईट तयार होत आहे, ईमेल तयार करण्यात आलेला आहे. पत्राद्वारेही आपल्या सूचना मराठीप्रेमी करू शकतात. सगळ्यांनी पुढे येऊन मराठीचे काम पुढे नेऊया असे प्राचार्य सामंत यांनी सांगितले. गोमंतक मराठी अकादमी व सरकार या वादातून आणखी वाद निर्माण होऊ नये, तर काही चांगले घडावे असे आम्हाला वाटते. मराठीसाठी काही चांगले घडत असताना त्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ नये असे आम्हाला वाटते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठी अकादमीची स्वतःची वास्तूही लवकरच उभी राहील असे प्राचार्य सामंत यांनी सांगितले.