ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने पुन्हा चक्रीवादळ घोंघावतेय

0
150

ओडिशाला संहारक फैलान वादळाने फटका दिल्यानंतर नेमक्या एका वर्षाच्या कालावधीनंतर आता या राज्यावर आणखी एक वादळ चाल करून येत असल्याची माहिती वेधशाळेतर्फे देण्यात आली आहे.
‘या वादळाची ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल सुरू असून तेनस्सरीत किनार्‍यासह अंदमानच्या सागरी भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास प्रारंभ झाला आहे. येत्या २४ तासात त्याची तीव्रता वाढणार आहे,’ अशी माहिती येथील भारतीय वेधशाळेचे संचालक सारत साहू यांनी दिली. कमी दाबाच्या पट्‌ट्याची तीव्रता वाढून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. कमी दाबाच्या पट्‌ट्याचे क्षेत्र गोपालपूरच्या १३५० कि. मी. अंतरला असून त्याचा परिणाम आंध्र प्रदेश व ओडिशा किनारपट्टीवर होणार आहे, असे साहू यांनी सांगितले. संभाव्य वादळाच्या हालचालीची नेमकी माहिती आज ८ रोजी किंवा उद्या मिळणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
येत्या १० पासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या स्थितीचे रुपांतर चक्रीवादळात झाल्यास त्याचे नामकरण ‘हुडहूड’ असे केले जाईल असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी ओडिशा किनारपट्टीला धडकलेल्या चक्रीवादळावेळीही तेनास्सरीम किनारपट्टीवरच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यानंतर ओडिशाच्या १८ जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख लोकांना फटका बसला होता.